Ahmednagar News : कोरोनाच्या जागतिक महासंकटात बळी पडलेल्या मृतांच्या वारसांची, कोरोना एकल महिलांची फरफट अजूनही सुरू आहे. कोरोना मृतांच्या वारसांना देय ५० हजार रुपयांचे सहायक अनुदान मंजूर होऊन दोन वर्षे उलटल्यानंतरही पैसे बँक खात्यात जमा झाले नाहीत.
बँका व सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने जिल्ह्यातील आठशे लाभार्थ्यांचे ४ कोटी रुपये बँकांमधून परत सरकारी तिजोरीत गेल्याचे मिशन वात्सल्य समितीचे मिलिंदकुमार साळवे यांनी म्हटले आहे. मिशन वात्सल्यचे साळवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना याबाबत निवेदन देऊन त्यांचे याकडे लक्ष वेधले आहे. विभागीय महसूल आयुक्त राधाकिसन गमे यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने कोरोना मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपये सहायक अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार या वारसांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. अर्ज मंजूर होऊन दोन-दोन वर्षे उलटून गेली आहेत. पण, अजूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यासाठी वारसदार, कोरोना एकल महिला, त्यांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.
मंत्रालयातील मदत व पुनर्वसन विभागात याबाबतचे कामकाज केंद्रित झालेले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली तर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अंगुलीनिर्देश करतात. तर जिल्हाधिकारी कार्यालय मंत्रालयाकडे बोट दाखवत आहे.
अर्जदार लाभार्थी मात्र या दोघांच्या कात्रीत भरडले जात आहेत, असा साळवे यांनी आरोप केला आहे. नगर जिल्ह्यातील एका यादीतील ८७४ जणांचे सुमारे ४ कोटी रूपये खाते क्रमांकातील चुका व इतर कारणांमुळे बँकामधून पुन्हा सरकारी तिजोरीत परत गेल्याचे साळवे यांनी सांगितले.