अहमदनगर जिल्ह्यातील ह्या पोलिसांकडून ४४९ किलो गांजा जप्त

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता पोलिसांच्या गुड मॉर्निंग ‘पथकाने पहाटेची गस्त घालत असताना राहाता शहरातून विना नंबरच्या चार चाकी गाडीतून ४४ लाख ९७ हजार रुपये किंमतीचा ४४९ किलो गांजासद्दश पदार्थ जप्त केला आहे.

गांजासह चारचाकी गाडी, मोबाईल फोन असा मिळून सुमारे ५० लाख २७ हजाराचा मुद्देमाल जप्त करून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी दिली.

या घटनेप्रकरणी शिर्डी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी राहाता पोलीस स्टेशन येथे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक काकड, उपनिरीक्षक कमलाकर चौधरी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत माहिती देताना वमने यांनी सांगितले, की राहाता पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार काकड व पोलीस नाईक गडाख हे राहाता शहरात पहाटेची गस्त घालत असताना पहाटे पावणेसहाच्या सुमारास त्यांना जुनी पंचायत समिती रोड, शाही मस्जिदजवळील परिसरात बिना नंबरची चार चाकी गाडी आढळून आली,

संशय बळावल्याने त्यांनी गाडी थांबवून गाडीची नंबर प्लेट व इतर बाबींची चौकशी केली असता गाडीतील राहुल विनायक आरणे (वय ३२ वर्षे रा. आण्णाभाऊ साठेनगर), सचिन रामदास पवार (वय ३७ वर्षे, रा खंडोबा चौक, ता राहाता) या दोघांना अटक करण्यात आली तर प्रदीप सरोदे, अमोल (देघांचेही पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे दोघे फरार झाले आहेत.

पोलिसांनी हे वाहन राहाता पोलीस स्टेशन येथे आणून या वाहनाची तपासणी केली असता गाडीत पॅकिंगमध्ये एकूण ४४९ किलो ७९० ग्रॅम गांजासदृश पदार्थ आढळून आला. या गांजाची अंदाजे किमत ४४ लाख ९७ हजार इतकी असल्याचे बोलले जाते.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून दोन मोबाईल जप्त केले असून या मोबाईलवरील संदेशांवरून पुढील आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. जप्त केलेला गांजा तसेच दोन मोबाईल व चार चाकी वाहन हे सर्व मिळून सुमारे ५० लाख २७ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश कारभारी गडाख यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ६६/२०२४ नुसार गंगोकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (व), क, २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe