अहिल्यानगर- अहिल्यानगरमध्ये पती-पत्नीतील वादाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, पोलिस ठाण्यांतील भरोसा सेलमध्ये दरवर्षी दीड ते दोन हजार अर्ज दाखल होतात.
पती-पत्नीमधील कुरबुरी, गैरसमज आणि विश्वासातील तुटवडा हे अशा वादांचे प्रमुख कारण ठरत आहेत. बहुतांश वेळा पोलिसांचे समुपदेशन आणि नातेवाईकांचे मध्यस्थीतून तडजोड होते, पण काही प्रकरणं फारच गंभीर बनतात आणि घटस्फोटापर्यंत पोहोचतात.

दोन वर्षात ४९ घटस्फोट
मागील दोन वर्षांत ४९ प्रकरणांना अधिकृतरीत्या घटस्फोटाची मंजुरी मिळाली आहे. या आकड्यात न्यायालयीन प्रकरणांचा समावेश झाल्यास ही संख्या आणखी वाढू शकते. पती-पत्नी एकत्र येऊन समुपदेशन घेतल्यानंतरही काही जोडप्यांमध्ये समाधान होत नाही. काही वेळा पोलिसांसमोर वाद नसल्याचे सांगितले जाते, मात्र पुन्हा एकमेकांवर त्रास दिला जातो, ज्यातून प्रकरण पुन्हा उफाळून येते.
महिलेचा छळ आणि हुंडाबळी
पैशाच्या मागणीसाठी विवाहित महिलांवर होणाऱ्या छळाच्या अनेक तक्रारी पोलिस ठाण्यांत दाखल होत आहेत. लग्नाच्या वेळी दिलेला हुंडा आणि खर्च वसूल करण्यासाठी पती आणि त्याच्या कुटुंबावर हुंडाबळीचे गुन्हे दाखल केले जातात. यामुळे अनेक वेळा वाद आणखी गंभीर स्वरूप धारण करतात.
जबाबदाऱ्या आणि अपेक्षा
लग्नाआधी अनेक तरुण-तरुणी सुखी संसाराची स्वप्ने पाहतात, परंतु लग्नानंतर आलेल्या जबाबदाऱ्या आणि अपेक्षांमधील तफावत यामुळे नाती ताणली जातात. अनेक महिलांच्या तक्रारींमध्ये ‘मला स्वतंत्र जगायचं आहे’ हा विचार अधोरेखित होतो. त्यासाठी नवऱ्यापासून दूर राहण्याची आणि घटस्फोट घेण्याची मागणी केली जाते.
नातेवाइकांचा हस्तक्षेप
पती-पत्नीमधील वादात नातेवाइकांचा हस्तक्षेप हा देखील एक महत्त्वाचा घटक ठरतो. अनेक वेळा वादात त्यांची भूमिका विवाद वाढवणारी ठरते, परिणामी ते वाद न्यायालयात आणि घटस्फोटापर्यंत नेतात. कधी कधी हे हस्तक्षेप ‘सल्ला’ म्हणून सुरु होतात पण ‘वाद’ म्हणून संपतात.
समुपदेशनाद्वारे नाते टिकवण्याचा प्रयत्न
अशा प्रकरणांमध्ये भरोसा सेलची भूमिका फार महत्त्वाची असते. समुपदेशनाद्वारे पती-पत्नीमधील संवाद सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही काही प्रकरणं विश्वास हरवलेली आणि परत न जमणारी असतात. अशा प्रकरणांमध्ये विधी सेवा प्राधिकरण आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे घटस्फोट दिला जातो.
या सगळ्या घटनाक्रमातून असे स्पष्ट होते की, किरकोळ वाद देखील वेळेवर मार्गी लावले नाहीत तर ते सात जन्मांच्या नात्याची अखेर करू शकतात. त्यामुळे संवाद, समजूत आणि सहनशीलता हेच कोणत्याही नात्याचे खरे बळ आहेत.