Nagar News : नगर व श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यासाठी ५० कोटींचा निधी

Ahmednagarlive24 office
Updated:
Nagar News

Nagar News : गेल्या काही वर्षापासून वाळकी खंडाळा रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांकडून वेळोवेळी मागणी होत होती. रस्ताच वाहतुकी योग्य नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने नागरिक वैतागले होते.

मात्र, या रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजुर झाल्याने अखेर वाळकी- खंडाळा रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागून नागरिकांची कित्येक वर्षांपासून होणारी गैरसोय कायमची दूर होणार आहे.

पावसाळ्यात रस्त्याने येणे-जाणे मोठे कठिण होत असे. रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. याच रस्त्यावर गहिनीनाथांचे भव्य-दिव्य मंदिर आहे. परमपूज्य महेंद्रनाथांच्या पुढाकारातून हे मंदिर साकारलेले आहे. खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांप्रमाणे भक्तांचीही प्रचंड गैरसोय होत आहे. रस्त्याचा प्रथ मार्गी लावावा, अशी महेंद्रनाथांचीही मनोमन इच्छा होती. त्यांची ती इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे.

ग्रामस्थ बाळासाहेब धोंडे, ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे, बाळासाहेब भालसिंग, राजेंद्र मुरुमकर, गोवर्धन भालसिंग, दशरथ धोंडे यांनीही रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे साकडे घातले होते. याची दखल आ. पाचपुते यांनी घेतली.

मुंबईत नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी वाळकी खंडाळा या साडेपाच किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी विशेष दुरुस्ती अंतर्गत ५ कोटींचा निधी मंजुर केला. रस्त्याच्या कामासाठी निधी मंजुर झाल्याने लवकरच रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

रस्त्यामुळे धनगरवाडी, वाळकी व खंडाळा येथील नागरिकांची रस्त्याअभावी होणारी गैरसोय आता दुर होणार आहे. रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा. सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, आ. बबनराव पाचपुते, मा. सभापती रंगनाथ निमसे, विक्रम पाचपुते यांचे ग्रामस्थांनी विशेष आभार व्यक्त केले.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात विविध रस्त्यांच्या कामासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी म्हणजे १५ मार्च रोजी निधीस मंजुरी मिळाली. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी – चिंभळा (८ कि. मी.), चिंभळा वांगदरी (६ कि. मी.), वडगाव शिंदोडी – लोणी व्यंकनाथ श्रीगोंदा (७.५ कि. मी), देवदैठण – राजापूर – पिंप्री कोलंदर या रस्त्यांच्या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.

तसेच नगर तालुक्यातील खंडाळा-वाळकी (५ कि. मी.), नारायणडोह बाबुर्डी घुमट (८ कि. मी.) तसेच निंबळक – चास खंडाळा वाळुंज या रस्त्यांच्या कामासाठीही २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरील रस्त्यांमुळे नागरिकांची अनेक वर्षांपासून होणारी गैरसोय लवकरच दूर होणार आहे.

याकामी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांचे विशेष सहकार्य लाभले. या संदर्भात आ. बबनराव पाचपुते यांच्यामार्फत मंत्रालयस्तरावर गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड पाठपुरावा करावा लागला. त्या पाठपुराव्यास यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया भाजपचे युवानेते विक्रमसिंह पाचपुते यांनी बोलताना व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe