Ahmednagar News : अहमदनगरमधील ५९ पोलीस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या, १५ अधिकारी जिल्ह्याबाहेर

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील तयारीला लागले असून पोलीस प्रशासनात बदल्यांचे वारे वाहत आहे.

नुकत्याच काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशाने काही दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या पुन्हा नव्याने करण्यात आल्या. स्वःजिल्हा व तीन वर्षे सेवा अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढले.

या आदेशाने नगरमधील १५ अधिकारी पुन्हा जिल्ह्याबाहेर बदलून गेले. तर १५ अधिकारी इतर जिल्ह्यातून नगरमध्ये बदलून आले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ज्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाहीत, त्या रद्द करून नव्याने बदल्या करा, असा आदेश निवडणूक आयोगाने महासंचालक कार्यालयाला दिले.

त्यानंतर बदलीस पात्र असूनही जिल्ह्यातच असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी रात्री करण्यात आल्या.

चार वर्षातील सेवाकाळात एकाच जिल्ह्यात तीन वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेले तसेच स्वतःचा जिल्हा असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, तरीही काही अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर नेमणूक देण्यात आली होती. याप्रकाराची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेत पुन्हा बदल्या करण्याचे आदेश दिले होते.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार झाल्या आहेत की नाही याची खातरजमा करा. तसेच नियम डावलून केलेल्या बदल्या रद्द करा व नव्याने बदल्या करा, असे आयोगाने बजावले होते.

त्यानुसार नाशिक परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या ५९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

जिल्ह्यातून १५ अधिकारी बदलून गेले असून १५ अधिकारी इतर जिल्ह्यातून नगरमध्ये बदलून आले आहेत.

  • या अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली
    काही दिवसांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांना नियंत्रण कक्षात व विजय करे यांना जिल्हा विशेष शाखेत बदली देण्यात आली होती.
  • मात्र, दोन्ही अधिकाऱ्यांना जिल्ह्यात तीन वर्षे सेवा पूर्ण झाल्याचे त्यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे. नाशिक ग्रामीण येथून पोलिस निरीक्षक रवींद्र मगर व नंदुरबार येथून भरत जाधव हे नगरमध्ये बदलून आले आहेत.
  • नाशिक ग्रामीण येथून सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी तांबे, एकनाथ ढोबळे, मयूर भामरे, वर्षा जाधव यांची नगरमध्ये बदली झाली. तसेच ९ पोलिस उपनिरीक्षकांचीही नगरमध्ये बदली झाली आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe