माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील सात ओपन स्पेसमध्ये उद्यानासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तर सौरऊर्जा प्रकल्पाचासाठी नव्याने प्रस्ताव देण्यात आला होता. पर्यावरण विभागाकडे सतत पाठपुरावा केल्याने बक्षिसाच्या रक्कमेतून नव्याने ६ कोटींच्या निधीतून नव्याने उद्याने व सौरउर्जा प्रकल्पास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.
आ. संग्राम जगताप यांनी गेल्या काही महिन्यात शहर विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणला आहे. शहरातील रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी आला. त्यामुळे अनेक भागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. उद्याने ही शहराच्या सौंदर्यात भर घालतात. महापालिकेला मागील वर्षी माझी वसुंधरा अभियानांतर्गत बक्षीस मिळाले होते.
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीची दखल पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालयाने घेतली. बक्षिसाच्या सहा कोटी रुपयांच्या निधीतून नव्याने उद्याने विकसित करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता.
राज्य शासनाच्या पर्यावरण विकास विभागाने ६ ऑगस्ट २०२४ रोजी आदेश काढून नगर शहरातील सुमारे ९ उद्यानांसाठी प्रशासकीय मान्यता देत सुमारे ६ कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे नगर शहरातील उद्यानांमुळे शहरातील सौंदर्यात भर पडणार आहे.
प्रस्तावित उद्याने व निधी, राजे संभाजीनगर बोल्हेगाव, नंदनवन नगर सावेडी, सिव्हील कॉलनी मुकुंदनगर भवानी नगर, साई कॉलनी लिंक रोड केडगाव, लक्ष्मीनगर ओपन स्पेस सावेडी, ऐश्वर्यानगरी श्रीराम चौक सावेडी, सोलर पॉवर प्लॅट सावित्रीबाई फुले, संकुल, आयईसी लवकरच उभारण्यात येतील.
माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नगर महानगरपालिकेला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा ६ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. या बक्षिसाच्या रकमेतून राज्य शासनाच्या निर्देशानुसार अहमदनगर शहरात ७ उद्याने व सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम प्रस्तावित करून राज्य शासनाकडे प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला होता. त्याला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. लवकरच उद्याने उभारण्यात येतील. असे मनपाचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले.