Ahmednagar News : कोपरगाव मतदारसंघातील गावठाणावर वास्तव्य करणाऱ्या बारा गावातील ७४७ कुटुंबांना हक्काचे उतारे मिळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात ज्या नागरिकांना स्वतःच्या मालकीची जागा नाही, असे असंख्य कुटुंब गावठाणच्या जागेवर वास्तव्यास होते. गावठाणच्या जागेवर मागील अनेक वर्षापासून वास्तव्य असल्यामुळे या कुटुंबांनी त्या जागेवर पक्की घरे देखील बांधली होती.
परंतु घरे बांधून देखील घराची जागा त्यांच्या नावावर नव्हत्या. जागा नावावर नसल्यामुळे अनेक शासकीय कार्यालयात अडचणी येवून बँकांचे कर्ज उपलब्धतेसाठी देखील अडचणी येत होत्या. त्यामुळे सदरच्या जागा नावावर व्हाव्यात अशी त्या-त्या गावातील कुटुंबांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी होती.
याबाबत आ. काळे यांनी जातीने लक्ष घातले. शासन दरबारी पाठ पुरावा करून सदरच्या जागेचा सिटी सर्व्हे विभागाला सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सिटी सर्व्हे विभागाकडून या गावातील गावठाण जागेचा सर्व्हे करण्यात आला आहे.
या मध्ये मतदार संघातील १२ गावातील ७४७ कुटुंबांचा मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये अंजनापूर – ३३, तळेगाव मळे ४६, धोंडेवाडी – ५१, पढेगाव – ११२, — बहादराबाद ४२, मढी खु. – ८५, मनेगाव – – ५३, मायगाव देवी- १२०, मोर्विस – ९३, वडगाव १५, सडे ३९, ओगदी ५८, अशा – एकूण ७४७ कुटुंबांचा समावेश आहे.
लवकरच या कुटुंबाना त्यांच्या नावच्या जागेचे उतारे वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या अडचणी व हक्काचे उतारे मिळणार असल्यामुळे या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून या कुटुंबांचा दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.
आ. काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे या ७४७ कुटुंबांना हक्काचे उतारे मिळणार असल्यामुळे या ७४७ कुटुंबांच्या सर्व सदस्यांनी आ. काळे यांचे आभार मानले.