२० मार्च २०२५, नेवासे : महाराष्ट्र शासनाने गोहत्येवर बंदी घातलेली असूनही, नेवासे येथील आठ सराईत गुन्हेगारांनी सातत्याने गोवंशाची कत्तल केल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, अबू शाबुद्दीन चौधरी, मोजी अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी आणि अकील जाफर चौधरी (सर्व रा. नायकवाडी मोहल्ला, ता. नेवासे) यांचा समावेश आहे. या सर्वांना अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हटवण्यात आले आहे.

नदीम चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी नेवासे शहर आणि आसपासच्या परिसरात गोवंशीय जनावरांची तस्करी, त्यांना क्रूर वागणूक देणे, कत्तल करणे, धार्मिक भावना भडकवणे आणि यापूर्वीच्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या.
या गुन्ह्यांविरोधात नेवासे पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेळोवेळी छापे टाकून कारवाई केली होती. यापूर्वीही त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली होती, परंतु त्यांनी स्थगिती मिळवली होती. तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने पोलिसांनी पुन्हा कठोर पाऊल उचलले.
नेवासे पोलिसांनी या टोळीतील नऊ सदस्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. अहिल्यानगर पोलिस अधीक्षकांनी हा प्रस्ताव मान्य करून या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, या नोटीसीला कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिस अधीक्षकांनी हद्दपारीचा अंतिम आदेश जारी केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कल्लुबमें आणि शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पोलिस उपनिरीक्षक जरे, पोलिस हवालदार राम माळी आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल वर्षा गरड यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
नेवासे पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी स्पष्ट केले की, “गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कोणालाही माफ केले जाणार नाही. यापुढेही काही सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल.” या घटनेमुळे परिसरात पोलिसांच्या कडक धोरणाचे संकेत मिळाले आहेत.