शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातील ८३ पाझर तलाव, साठवण बंधारे, को.प. बंधारे, सिमेंट नाला बंधारे, यामधील गाळ काढण्यासाठी शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहिमेंतर्गत ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली.
शेवगाव पाथर्डी मतदारसंघात १९७२ च्या कालावधीत व नंतर शेकडो साठवण बंधारे, पाझर तलाव करण्यात आले होते; परंतु वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रवाहाबरोबरच वाहून आलेल्या मातीमुळे या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. त्यामुळे साठवण तलावाची पाणीक्षमता कमी होऊन पाझर कमी झाला होता, त्यामुळे पाणीसाठा कमी होऊन शेतकऱ्यांना विंधन विहिरींना पाझराचा फायदा होत नव्हता.

त्यामुळ शासनाने जानेवारी २०२३ मध्ये शासननिर्णयाद्वारे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना ३ वर्षांकरिता मंजुर केली होती. परंतु आता ही योजना ३ वर्षाकरिता मर्यादित न राहता कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. त्यानुसार २०२५-२०२६ करिता शेवगांव- पाथर्डी तालुक्यातील सुमारे ३६ गावांतील ८३ साठवण बंधारे पाझर तलाव, को प बंधारे, सि.ना. बंधारे यामधील गाळ काढण्याच्या कामाकरिता ४ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखाली शासन निधी तसेच सार्वजनिक व खासगी भागीदारी व अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर व सनियंत्रणात हे काम होणार आहे. याद्वारे तलावांमधील काढलेला गाळ (सुपीक माती) शेतकऱ्यांना शेतामध्ये पसरून शेतजमीन सुपीक करता येणार आहे. याकरिता स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील शेवगाव तालुक्यातील गोळेगाव, लाडजळगाव, प्रभूवाडगाव, बेलगाव, ढोरजळगाव ने, बोधेगाव, ठाकूर पिंपळगाव, चापडगाव, माळेगाव, मुरमी, हसनापूर, राक्षी, वरूर खुर्द, भगुर, सालवडगाव व पाथर्डी तालुक्यातील करोडी, जिरेवाडी, जवखेडे खा., भिलवडे, येळी, खरवंडी, मोहटे, हात्राळ, निपाणी जळगाव, चिंचपूर इजदे, सांगवी, चितळी, तीनखडी, मढी, जवखेडे दुमाला, कोरडगाव, पिंपळगाव टप्पा आदी गावांतील ८३ बंधारे व पाझर तलावांतील गाळ काढण्यासाठी कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, अशासकीय संस्थांच्या ठरावानुसार त्यांना काम वाटप करण्यास मान्यता दिली असल्याचे आ. राजळे यांनी सांगितले.
शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. तलाव बंधारे गाळमुक्त झाल्यामुळे तलावाची साठवणक्षमता वाढेल व पाणी पाझरण्याचे प्रमाण वाढेल, यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाचा फायदा होणारा असून, भूगर्भातील पाणी पातळी वाढून जमीन सुपीक होईल.