Swami Samarth : दत्त संप्रदायाचा महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसार करणारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरे तर अक्कलकोट स्वामींनी अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले आहे. अक्कलकोट स्वामी श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जातात.
अशी मान्यता आहे की गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झालेत. अक्कलकोट स्वामी विविध ठिकाणी विविध नावांनी ओळखले जातात. अक्कलकोट स्वामींचे भक्त त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखतात. दरम्यान श्री स्वामी समर्थांच्या लाखो भक्तांसाठी एक आनंदवार्ता आहे. श्री स्वामी समर्थ यांची भव्य दिव्य 108 फूट उंचीची मूर्ती अक्कलकोट येथे साकारली जाणार आहे.
हा प्रकल्प तब्बल 42 एकर जागेवर तयार होणार असून या प्रकल्पाचे नुकतेच सादरीकरण पूर्ण झाले आहे. हे सादरीकरण नवीन राजवाडा प्रांगणात संपन्न झाले आहे. या सादरीकरण कार्यक्रमाला अक्कलकोट संस्थानचे नरेश मालोजीराजे भोसलेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्रीमंत छत्रपती वृषाली राजे शिवाजी राजे भोसले (सातारा), श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत नंदिता राजे घाटगे (कागल), श्रीमंत पद्मजाराजे पटवर्धन (मिरज) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निश्चितच अक्कलकोट येथे 42 एकर जागेवर स्वामी समर्थांची भव्य दिव्य 108 फूट उंचीची मूर्ती साकारली जाणार असल्याने ही महाराष्ट्र आणि कर्नाटकात वास्तव्यास असलेल्या तमाम स्वामी भक्तांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.
कुठं तयार होणार 108 फूट उंचीची अक्कलकोट स्वामींची मूर्ती
मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट संस्थान राजघराण्याच्या राम तलाव या 42 एकरावरील निसर्गरम्य परिसरात हा प्रकल्प साकारला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सुप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपूर यांना अक्कलकोट स्वामींचा दृष्टांत झाला आणि या दृष्टांतानुसारच अक्कलकोट येथे 42 एकर जागेवर 108 फूट उंचीची अक्कलकोट स्वामींची मूर्ती उभी राहणार आहे.
दरम्यान या कार्यक्रमावेळी अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात बसलेल्या तमाम स्वामी भक्तांना या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या जागेची निवड श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनीच केली आहे. ही जागा अक्कलकोट स्वामींच्या दृष्टांतामुळेच निवडण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकल्पांतर्गत अक्कलकोट येथील नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचाराची सेवा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. एकंदरीत या भव्य दिव्य प्रकल्पामुळे अध्यात्मिक पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संपूर्ण देशातील स्वामी भक्तांमध्ये आनंदाची लहर आली आहे. आता स्वामी भक्तांच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे.