अहिल्यानगर : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वार उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाजवळ उडाला. तेव्हा ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शहरालगतच्या कृष्णा लॉन्सजवळ घडली.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सुदाम देवराम वर्पे (वय ४८, रा. चिकणी, ता. संगमनेर) हे आपल्या (एमएच १७ एम ९८७९) क्रमांकाच्या दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जात होते. तेव्हा नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा लॉन्स जवळ वर्पे यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या मुकेश दिनकर बहिरट (रा. शिवाजीनगर, पुणे) यांच्या (एमएच १२ एनयु ०४९७) क्रमांकाच्या आयटेन कारने धडक दिली.कारची जोरात धडक बसल्याने दुचाकीस्वार दुचाकीवरून उडून जवळच असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकापुढे पडला.

चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला. या अपघाताची माहिती समजताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी पहाणी करून अपघाताचा पंचनामा केला. याप्रकरणी मयत दुचाकीस्वार वर्पे यांचा मुलगा शुभम सुदाम वर्पे याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक मुकेश दिनकर बहिरट (रा. शिवाजीनगर, पुणे) व ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.