बिबट्याच्या भीतीने लावला पिंजरा ; पिंजरा उघडल्यावर लोकांना जे दिसले ते बघून…

Karuna Gaikwad
Published:

१८ फेब्रुवारी २०२५ वळण : राहुरी तालुक्यातल मानोरी येथे शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्‌याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याऐवजी कुत्रे अडकले,तर बिबट्याने दुसरीकडे पलायन केले.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, बिबट्या जेरबंद होईपर्यंत पिंजरा हटवू नये, अशी मागणी केली जात आहे.

रविवारी साडेअकराच्या सुमारास मानोरी गणपतवाडी शिवारातील हापसे बस्तीवर राहणारे विठ्ठल हापसे हे घरामागील शेतात गिन्नी गवत कापत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.बिबट्याने त्यांच्या डोक्याला पंजाने मारले तसेच डाव्या खांद्याला चावा घेतला, मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले.

याबाबतची माहिती मिळताच राहूरी वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले.वनपाल आर. एस. रासकर, एल. पी. शेंडगे, वनरक्षक आर. सी. आडगळे, समाधान चव्हाण, राजू घुगे, गाडेकर, वनमजूर गोरख मोरे, बबन जाधव, एम. एस. शेळके, शिनारे, पठाण, दिवे, ढोकणे, वाहनचालक ताराचंद गायकवाड यांनी मानोरीत हापसे वस्ती परिसरात रियाज पठाण यांच्या शेतात पिंजरा लावला.

रविवारी रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास बिबट्याने पिंजऱ्याला हुलकावणी देत पलायन केले, अशी माहिती शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांनी दिली.मात्र, सकाळी ग्रामस्थांना पिंजऱ्यात बिबट्याऐवजी कुत्रा अडकलेला आढळला, त्याला लगेच सोडून देण्यात आले. सोमवारी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता बिबट्या अजूनही परिसरात फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून तो जेरबंद होईपर्यंत पिंजरा हलवू नये, अशी मागणी सरपंच प्रतिनिधी बापूसाहेब वाघ, पोलिस पाटील भाऊराव आढाव, दीपक हापसे, अण्णासाहेब तोडमल, दीपक खुळे, गंगाधर बाचकर, इंजिनियर लक्ष्मण खामकर, रामदास सोडणर, पोपट कारंडे, अमजद पठाण, सिराज पठाण, दादासाहेब आढाव, डॉ. सागर शेलार, गोविंद वाघ, राजू पठाण आदींनी केली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विठ्ठल हापसे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना धीर दिला. मात्र, बिबट्याने जागा बदलल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थ महिलांना शेतात जाण्यास भीती वाटत असून बिबट्या पकडला जाईपर्यंत शेतीकामेही ठप्प झाली आहेत.

शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी

• शेतात काम करताना एकापेक्षा जास्त लोकांनी सोबत असावे.
• रात्रीच्या वेळी बॅटरी, मोबाईलचा प्रकाश आणि अधिक उजेडाचा वापर करावा.
• मोठ्याने गप्पा माराव्यात, मोबाईलवर गाणी वाजवावीत.
• घराच्या आणि गोठ्याच्या परिसराला कुंपण किंवा तारांचे संरक्षण करावे.
• रात्रीच्या वेळी घराच्या आणि गोठ्याच्या परिसरात प्रखर प्रकाशाचा वापर करावा.
• शेळ्या, कोंबड्या सुरक्षित ठिकाणी बांधाव्यात.
• बिबट्‌या दिसल्यास गावकऱ्यांना त्वरित माहिती द्यावी आणि फटाके वाजवावेत.
• रात्री बाहेर पडताना काठी आणि बॅटरी जवळ ठेवावी, तसेच एकटे न जाता गटाने फिरावे

पिंजरा हलवू नये

“बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.तो जेरबंद होईपर्यंत वनविभागाने पिंजरा हलवू नये.’ – सरपंच ताराबाई भीमराज वाघ, मानोरी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe