Ahmednagar News : दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासात मदत करण्यासाठी व त्याच्यावर तडीपारीची कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षकांसाठी लाचेची मागणी करणाऱ्या शिर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस हवलदार संदीप गडाख याच्यावर लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील एकावर शिर्डी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपीवर पोलीस तडीपारीची कारवाई करणार असल्याचे सांगत पोलीस हवालदार संदीप गडाख यांनी तक्रारदाराकडे दि. १५ जून २०२३ रोजी पोलीस निरीक्षकांसाठी एक लाख ते दिड लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
तडजोडी अंतर्गत तीस हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दि. २६ जुलै २०२३ रोजी दर्शवली. याप्रकरणी तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाच लुचपत विभागाने सापळा रचला असता पोलीस हवालदार गडाख यांनी तक्रारदाराकडून तीस हजार रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यावरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपाधीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र गीते, परशुराम जाधव, शरद हेम्बाडे यांनी कारवाईत भाग घेतला. या कारवाईने शिर्डी पोलीस दलात खळबळ उडाली आहे.