Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरूद्ध आता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर पोलिस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव बबनराव भोर (रा. देसवडे ता.पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चितळेविरूद्ध कलम १५३ सह बदनामी केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
चितळे हिने फेसबुक पोस्टद्वारे संत तुकाराम महारांच्या अंभागाचा गैरवापर करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बदनामी केली असून जातीय तेढ निर्माण करण्यात प्रयत्न केला आहे. त्यामुळे चितळे हिच्यासोबतच ही पोस्ट लिहिणारे अॅड. नितीन भावे तसेच ही पोस्ट शेअर करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करावा, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पारनेर पोलिसांनी याची दखल घेऊन चितळेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता चितळे हिला ठाण्याच्या गुन्ह्यात जामीन मिळण्यापूर्वीच पारनेरच्या गुन्ह्यात अटक करून आणावी, अशी मागणीही भोर यांनी केली आहे.
केतकीविरूद्ध आतापर्यंत बारा गुन्हे दाखल झाले आहेत. अकोला, पवई-मुंबई, गोरेगाव-मुंबई, अमरावती, नाशिक, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मनाबाद, सातारा याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पारनेरमधील हा तेरावा गुन्हा आहे.