Ahmednagar News : श्रीगोंदा परिसरातील एका गावात एका ९ वर्षांच्या मुलीवर नात्यातील एका जणाने आपल्या मित्रासह सुमारे एक महिनाभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
याप्रकरणी दोन जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोनही आरोपींना पोलिसांकडून अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसारः श्रीगोंदा परिसरातील एका गावातील नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या नात्यातील एका तरुणाने आमिष दाखवत त्याच्या आजोबाच्या घरी घेऊन गेला व तिच्यावर मित्राच्या सोबतीने जबरदस्तीने अत्याचार केला तसेच या घटनेचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करून हे चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर मागील एक महिन्यापासून दोघेजण संगणमताने अत्याचार करत होते.
याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणातील मुलीच्या नात्यातील तरुणाला तत्काळ अटक केली तर दुसरा आरोपी गुन्हा दाखल होताच पळून जाण्याच्या मार्गावर असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला अटक केली. या घटनेने श्रीगोंदा परिसरात खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला ?
श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले असून, याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सध्या तरुणांचा कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या धंद्याकडे कल वाढला असून,
यातूनच अनेक दुर्दैवी घटना घडत असल्याची चर्चा होत असतानाच श्रीगोंदा पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला की काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.