महानगरपालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर विनापरवानगी वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

Published on -

शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन अत्यंत महत्त्वाचे असून, कोणत्याही झाडाची तोड करण्यापूर्वी महानगरपालिकेची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करत मे. गृह संजीवनी कन्स्ट्रक्शन इंजिनियर व डेव्हलपर्स यांच्या “देव गुलमोहर कमर्शियल प्रोजेक्ट” समोरील “रेन ट्री” वृक्ष विनापरवानगी तोडण्यात आले.

ही घटना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासन प्रमुख यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याची दखल घेत संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्र.उद्यान विभाग प्रमुख, प्र.उपवृक्ष अधिकारी शशिकांत नजान उद्यान विभाग कर्मचारी गणेश दाणे,विजय कुलाळ यांनी स्थळ पंचनामा करून शनिवार दि.१५ मार्च रोजी तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे ८ व २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे ८ ते १० वर्षे वय असलेल्या या वृक्षाची तोड बेकायदेशीररित्या करण्यात आली, त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेचा कडक इशारा :- शहरातील अनेक ठिकाणी नागरिक व काही विकासक महानगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेता झाडांची तोड करत आहेत. यापुढे असे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी आणि बांधकाम व्यावसायिकांनी कोणत्याही झाडाची तोड करण्यापूर्वी महापालिकेकडून लेखी परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

कामगारांनाही सूचना :- झाडांची तोड करणाऱ्या कामगारांनी देखील महापालिकेची योग्य ती परवानगी घेतली आहे की नाही, याची खातरजमा करूनच झाडे तोडावीत. अन्यथा अशा कामगारांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल.

पर्यावरणाचे महत्त्व :- वाढते शहरीकरण आणि वृक्षतोड यामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून, तापमानवाढ, पूरस्थिती, वायुप्रदूषण यासारख्या समस्या अधिक तीव्र होत आहेत. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की, शहरातील झाडे वाचवण्यासाठी योगदान द्यावे. वृक्ष तोडण्याऐवजी झाडे लावण्यावर भर द्यावा, कारण “झाडे वाचवा – पर्यावरण वाचवा” ही काळाची गरज आहे.

कोणतीही झाडतोड करताना अधिकृत परवानगी घ्यावी व पर्यावरण संरक्षणास सहकार्य करावे. असे आवाहन आयुक्त तथा प्रशासकी यशवंत डांगे यांच्या वतीने करण्यात आले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe