अहिल्यानगर : नगर पुणे महामार्गावर नगर तालुक्यातील चास गावाच्या शिवारात रात्रीच्या वेळी वाहनचालकाला रस्त्यात अडवून मारहाण करत लुटल्याची घटना दि. १९ मार्चला रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत केडगाव येथील तीन आरोपींना पहाटेच्या सुमारास पकडले आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
याबाबत तौफिक शरीफ अन्सारी (वय २९, रा. झारखंड राज्य) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे १९ मार्चला रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील कंटेनर (क्र. एमएच ४३ सी ई ३९६१) घेवून पुण्याहून नगरच्या दिशेने येत असताना चास शिवारात बजाज पल्सर मोटारसायकल (क्र. एमएच १६ डी ई ४९७७) व एका मोपेड गाडीवर तीन अनोळखी तरुण आले.

त्यांनी पेट्रोल पंपासमोर कंटेनरला दुचाक्या आडव्या लावून कंटेनर रस्त्याच्या कडेला थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर तिघांनी चालक तौफिक अन्सारी यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत अन्सारी यांच्याकडील सात हजारांची रोकड तसेच कागदपत्रे असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत तेथून पळून गेले. जाताना त्यांनी कंटेनरच्या काचांवर दगड फेकून मारत त्या फोडून नुकसान केले.
या घटनेनंतर कंटेनर चालकाने पेट्रोलपंपावर जावून तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधून लुटमारीची माहिती दिली. ही माहिती मिळताच स.पो.नि. प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरु केला. सदरचा गुन्हा केडगाव येथील तिघांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी केडगावच्या एकनाथ नगर येथील सनी मच्छिंद्र धोत्रे (वय १९) व त्याचे शाहुनगर येथे राहणारे २ अल्पवयीन साथीदार यांना पहाटे पकडले.
याबाबत कंटेनरचालक तौफिक अन्सारी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी तिघा आरोपींच्या गुन्हा दाखल केला आहे.