हरवलेल्या मुलाला घेण्यासाठी निघालेल्या पित्याला नगर जिल्ह्यात लुटले ; ‘या’ घाटातील घटना

Published on -

Ahmednagar News : आठ दिवसांपासून हरवलेल्या मुलाला घेण्यासाठी निघालेल्या पित्याला नगर पुणे महामार्गावर कामरगाव घाटात अनोळखी ३ चोरट्यांनी कोयता व चाकूचा धाक दाखवत ३ लाख २८ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी (दि.१) पहाटे ३.३० च्या सुमारास घडली आहे.

सदरचे चौघेजण कोल्हापूरहून शिर्डीकडे कारमधून जात होते. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात तिघा चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश मोहन शिंदे (रा. कदमवाडी, ता. करवीर जिल्हा कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटलं आहे, की फिर्यादी शिंदे यांचे मित्र विरेंद्र प्रभाकर सावंत यांचा मुलगा आठ दिवसांपासून हरवला होता. तो शिर्डी येथे सापडल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितले.

त्यामुळे त्या मुलाला ताब्यात घेण्यासाठी फिर्यादी शिंदे, त्यांचे मित्र विरेंद्र सावंत, नितीन मनोहर सावंत आणि चालक शिवाजी शंकर राठोड हे सर्वजण रविवारी (दि. ३०) सायंकाळी कोल्हापूरहून शिर्डीकडे इनोव्हा कारमधून (क्र. एम एच. ०९ जी. एफ. ००५०) जायला निघाले. पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी हे सर्वजण सुपा ओलांडून कामरगाव परिसरात आले असता घाटात लघुशंकेसाठी थांबले होते.

त्यावेळी अचानक त्या ठिकाणी विना नंबरच्या पल्सर या दुचाकीवरुन अनोळखी तिघेजण आले. त्यांनी हातात असलेला कोयता, चाकूचा धाक दाखवत फिर्यादी शिंदे यांच्या हातातल्या बोटांत असलेल्या वेगवेगळ्या राशींचे खडे असलेल्या १५ ग्रॅमच्या अंगठ्या, गळ्यातली तीन तोळ्यांची सोन्याची चैन त्या तिघांनी हिसकावून घेतली.

फिर्यादी शिंदे यांचे मित्र नितीन सावंत यांच्याकडील रुपये रोख रक्कम, दूसरे मित्र विरेंद्र सावंत यांच्या बोटांतल्या प्रत्येकी एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, सॅमसंग कंपनीचं स्मार्ट वॉच असा एकूण ३ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन ते तीन अनोळखी चोरटे विनाक्रमांकाच्या पल्सर या दुचाकीवरुन सुपा गावाकडे निघून गेले.

या लुटी बाबत फिर्यादी शिंदे यांनी नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांचे गस्तीपथक तातडीने त्या ठिकाणी गेले. मात्र चोरट्यांचा काहीही मागमूस लागला नाही. या प्रकरणी शिंदे यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News