Ahmednagar News : साईबाबांच्या श्रद्धेपोटी अनेक गोर गरीब रुग्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिर्डी येथे येत असतात. येथील साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालयात अशा रुग्णांवर साईंचे रुग्णसेवेचे वचन जपत उपचारही केले जातात.
याच साईंच्या रुग्णसेवेला जपत संस्थानच्या रुग्णालयात एका ४५ वर्षीय महिलेच्या पोटातून साडेपाच किलो वजनाचा गोळा काढण्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया स्त्री रोग तज्ञ डॉ. निर्मला स्वाधीन गाडेकर यांनी यशस्वीपणे करून दाखविली.

परभणी येथून आलेल्या महिलेची शस्त्रक्रिया प्रसिद्ध सर्जन डॉ. राम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ञ डॉ. निर्मला गाडेकर यांनी करत पोटातील साडेपाच किलो वजनाचा गोळा व गर्भाशय यशस्वीपणे काढत महिलेचे प्राण वाचवले.
या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. आर. साई यांनी भुलतज्ञ म्हणून काम केले. नर्स अर्चना वाकचौरे, मीना वाळे, श्रीमती सापिके आदींनी त्यांना सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर साईंची कृपा व डॉ. गाडेकरांच्या प्रयत्नांमुळे मला जीवदान मिळाल्याची भावना रुग्ण महिलेने व्यक्त केली.
याबाबत डॉ. गाडेकर म्हणाल्या की, या महिलेचे यापूर्वी दोन सिझेरियान ऑपरेशन झालेले होते. तिला गेल्या ५-६ महिन्यांपासून गंभीर पोटदुखी, दम लागणे, पोटाचा आकार वाढून जड वाटू लागणे यासारखी लक्षणे जाणवत होती. साडेपाच किलो वजनाचा पोटात असलेला गोळा यामुळे त्या महिलेची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती.
तिला असह्य वेदना होऊन दम लागत होता. या महिलेची शस्त्रक्रिया आम्हा सर्वांसाठी आव्हानात्मक होती; परंतु श्री साईबाबांवर आलेली श्रद्धा आणि डॉ. राम नाईक यांचे पाठबळ यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली. रुग्णाची सर्व वेदनांपासून कायमस्वरूपी मुक्तता झाली आहे.
डॉ. गाडेकर यांनी केलेल्या कामगिरीबद्दल साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक माजी ले. कर्नल डॉ. शैलेश ओक, उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. राम नाईक, सर्व डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी गौरव केला आहे.
साईबाबांचे आशीर्वाद, सहकारी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पाठबळ नेहमीच लाभते. त्या माध्यमातून अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवदान देण्याचे भाग्य मला लाभले, हा माझ्या दृष्टीने मोठा आनंदाचा क्षण असतो.
ज्यावेळी रुग्ण सांगतात, की “साईबाबांची दुवा आणि डॉक्टरांची दवा यामुळे आमचा नवा जन्म झाला”, त्यावेळी डॉक्टर झाल्याचे सार्थक वाटते. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.–डॉ. निर्मला गाडेकर, साईसंस्थान रुग्णालय