Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कौठा आणि अजनुज शिवारात रविवारी दि.११ रोजी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीत दागिने आणि रोकड असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला.
तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप दोन तीन ठिकाणी झालेल्या चोरी बाबत कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली नसल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कौठा शिवारातील हनुमंतवाडी येथे चोरट्यांनी गणेश सूर्यवंशी यांच्या राहत्या घरात दरवाजा तोडून प्रवेश केला. सूर्यवंशी यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर चोरट्यांनी हात साफ केला.
गवळवाडी येथील गजानन गवळी यांच्या वस्तीवर चोरट्यांनी तेथील कामगारांच्या बंद खोल्यांचे कुलूप तोडले. मात्र, चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर कौठा शिवारातील लगडवस्तीवर संदीप लगड यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला.
मात्र घरात झोपलेली आणि शेजारी जागे झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. अजनुज शिवारातील माळवाडी येथील दत्तात्रय गिरमकर यांच्या घरातून चोरट्यांनी दागिने चोरल्याची माहिती मिळाली असून या सर्व घटनेत चोरट्यांनी एकूण पाच लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.