‘या’ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री फोडली दहा दुकाने ..!

Pragati
Published:

Ahmednagar news : श्रीगोंदा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून नुकतेच शिवाजीनगर भागातील एक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे बंद असलेले घर फोडून लग्नासाठी ठेवलेले दागिने लंपास केल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच श्रीगोंदा बाजारपेठेत शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल दहा दुकाने फोडून ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

चोरट्यांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

येथील वैभव खंडके हे पहाटे हॉटेल उघडण्यासाठी आले असता त्यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी मोबाईल शॉपीचे मालक पोपट खराडे यांना फोन केला.
दोन चोरट्यांनी शनिवारी पहाटे सुमारास देवकी कॉम्प्लेक्स मधील चार दुकाने, हॉटेलचे शर्ट्स तोडले नंतर काष्टी रोडवर इतर सहा दुकाने फोडून चोरी केली. संपत खराडे यांची मोबाइल शॉपी, अशोक खंडके यांचे हॉटेल, महावीर पटवा यांचे कृषी सेवा केंद्र, आकाश मोरे यांची मोबाइल शॉपी, असिफ पठाण यांचे अटो मोबाइलचे दुकान, सुरज शिंदे यांचे मेडिकल, वैभव कोकाटे यांचे कपड्यांचे दुकान, शुभम बोरुडे यांचे कॉफे, गुलाब सहाणी यांची बेकरी तर समीर बागवान यांचे लस्सी सेंटर चोरट्यांनी फोडले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी भैरवनाथ चौकात तीन दुकाने फोडली होती.

त्यानंतर बाबुमियों बॅण्डवाले यांची चोरी झाली. नंतर संभाजी पवार यांची पावणे तीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी काष्टीला अकरा दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच श्रीगोंदा शहरातही चोरी झाल्याने व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे.

आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा व काष्टी येथील चोरीच्या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चोरीच्या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळास भेट दिली. यावेळी श्वान पथकाने मार्ग दाखविला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe