Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात एका व्यक्तीने पोलिस स्टेशनच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आप्पासाहेब बाबासाहेब पवार (वय ३५) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे.
एका माजी नगरसेवकाने धमकावल्याने पवार याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. लोणी येथील रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव शहरातील एका माजी नगरसेवकाने आप्पासाहेब बाबासाहेब पवार (रा. अंबिका नगर कोपरगाव) यास कायम धमकावत होता.
त्याने पवार यांना यापूर्वी मारहाणही केली होती. अशी चर्चा असून सततच्या दबावास वैतागुन पवार यांनी गुरुवारी पोलिस ठाण्याच्या आवारात विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पवार हे विष प्राशन करत असल्याचे महिला कॉन्स्टेबल त्रिभुवन यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिस कॉन्स्टेबल कुन्हे यांना माहिती दिली. त्यांच्या हातातून विषाची बाटली हिसकावून घेत तात्काळ रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना लोणी येथे दाखल करण्यात आले. याबाबत अद्याप कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.