श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, अशी मागणी गेल्या ३०-३५ वर्षांपासून सातत्याने केली जात होती. आता अखेर ही मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेहरू भाजी मार्केटच्या जागेवर बसवला जाणार असून, येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
विशेष म्हणजे, फक्त पुतळा नव्हे, तर येथे एक भव्यदिव्य शिवसृष्टीच उभारली जाणार आहे. त्यामुळे श्रीरामपूरच्या नागरिकांचे एक दीर्घकाळापासूनचे स्वप्न साकार होताना दिसत आहे.

श्रीरामपूर शहरात छत्रपतींचा पुतळा बसवावा, ही मागणी १९९० पासून जोर धरत होती. यासाठी अनेक संघटनांनी उपोषणे, रास्ता रोको अशी आंदोलनेही केली.
पण राजकीय मतभेद आणि इतर कारणांमुळे हा निर्णय रखडत राहिला. माजी आमदार जयंतराव ससाणे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन पुतळा बनवण्याचे काम नाशिकच्या मिनल आर्ट यांना सोपवले. या पुतळ्यासाठी सुमारे २६ लाख रुपये खर्च झाले.
हा पुतळा २०१५ मध्येच तयार झाला होता. पण त्यानंतर तो कलादालनातच पडून राहिला. २०१५ पासून आजतागायत या पुतळ्याच्या भाड्यासाठी पालिकेला १२ ते १३ लाख रुपये मोजावे लागले. तरीही गेल्या १० वर्षांपासून हा तयार पुतळा शिवाजी चौकात बसवला जावा, अशी मागणी होती. पण शासकीय परवानग्या आणि न्यायालयीन अडथळ्यांमुळे हे शक्य झाले नाही.
मात्र, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि या अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर हा पुतळा नेहरू भाजी मार्केटमध्ये बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यासाठी निविदा मागवल्या गेल्या आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करून टेंडरही देण्यात आले. या पुतळ्यासाठी आता ७० ते ७१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू होईल. स्ट्रक्चर पूर्ण झाल्यावर नाशिकहून हा पुतळा श्रीरामपूरात आणला जाईल. पुतळ्यात काही त्रुटी होत्या, त्या दुरुस्त केल्या असून लवकरच तो बसवला जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली.
या संपूर्ण प्रक्रियेला आता अंतिम स्वरूप मिळत आहे. नेहरू भाजी मार्केटच्या पश्चिम बाजूला हा पुतळा उभारला जाणार आहे. पुतळा कुठे बसतोय हा मुद्दा महत्त्वाचा नाही,
तर श्रीरामपूरच्या लोकांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होतेय हे महत्त्वाचे आहे. अनेक अडचणींवर मात करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांनी हे स्वप्न सत्यात उतरत आहे, असे भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे म्हणाले.
दुसरीकडे, ओबीसी सेलचे प्रकाश चित्ते यांनी यावर वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले, “छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकातच बसवावा, ही आमची जुनी मागणी आहे.
पालिका हा पुतळा नेमका कुठे बसवणार, याची आम्हाला स्पष्ट माहिती नाही. तरीही आम्ही याबाबत मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. आमचा आग्रह कायम आहे की पुतळा शिवाजी चौकातच असावा.”
अखेर, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामपूरच्या नागरिकांचे हे स्वप्न पूर्णत्वाकडे जात आहे. एप्रिलमध्ये कामाला सुरुवात होताच ही ऐतिहासिक घटना प्रत्यक्षात साकार होईल.