Ahmednagar News : दाढ खुर्द परिसरात मागील पंधरा दिवसांत चार ते पाच वेळा बिबट्याकडून मनुष्यावर हल्ले झाले आहेत. शुक्रवार दि. २१ जुलै रोजी सकाळी बिबट्याने पुन्हा रस्त्यावरुन जात असलेल्या एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दाढ खुर्द शिवारातील शिंगोरे वस्ती जवळून पोपट ऊर्फ रामा कारभारी पर्वत (वय ६५) हे ज्येष्ठ गृहस्थ नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ६. १५ वा. घराकडून व्यवसायानिमित्त गिरणीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून चालले होते. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात भक्षाच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करत त्याना झुडपात ओढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी या ज्येष्ठ व्यक्तीने मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे त्यांचा आवाज ऐकून किशोर जोशी व नारायण शिंगोरे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान दाखवत या बिबट्याला हुसकावून लावले. त्यामुळे या ज्येष्ठ व्यक्तीची या बिबट्याच्या जबड्यातून मुक्तता झाली.
यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने मुलगा संजय पर्वत व पुतणे विकास पर्वत यांनी दाढ बुद्रुक येथील आरोग्य केंद्रात पोपट पर्वत यांच्यावर प्राथमिक उपचार घेऊन नगर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. तर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर वनविभागाने काही दिवसांपूर्वी याठिकाणी पिंजरा लावला खरा पण बिबट्यासाठी कोणतेही भक्ष्य या पिंजऱ्यात न ठेवल्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात अडचणी येत आहेत.
गेल्या काही दिवसांतील हल्ल्याच्या घटना पाहता जीवितहानी होण्यापूर्वीच वनविभागाने वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांशी चर्चा करुन या परिसरात योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी सरपंच सतीश जोशी, ग्रामपंचायत सदस्य चेतन पर्वत, नितिन पाबळे, नारायण शिंगोरे, विलास पर्वत, संजय पर्वत, रामदास जोशी, संपत जोशी, आकाश जोशी, संदीप झनान, बाबासाहेब शिंगोरे, सुनील जोशी, सुरेश जोरी, दगडू साळवे, मनोहर जोशी आदींसह नागरिकांनी केली.
पिंजऱ्याला हुलकावणी
दाढ खुर्द परिसरात बिबट्याच्या मनुष्यावर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर वनविभागाने काही दिवसांपूर्वी याठिकाणी पिंजरा लावला. पण बिबट्यासाठी कोणतेही भक्ष्य या पिंजऱ्यात न ठेवल्यामुळे बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत आहे.