Ahilyanagar News : बिबट्याने एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. मात्र, शेजारील नागरिकांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे आणि प्रतिकारामुळे बिबट्याने पळ काढल्याने शेतकरी थोडक्यात बचावला. मानोरी येथील गणपत वाडी रस्त्यालगत असलेल्या हापसे वस्तीतील विठ्ठल रामभाऊ हापसे (वय ५७) हे घराशेजारील शेतात गिन्नी गवत कापत असताना, गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला.
बिबट्याने हापसे यांच्या डोक्याला पंजाने जोरदार फटका मारला आणि डाव्या खांद्यावर खोल चावा घेतला. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी त्यांचा मुलगा दीपक हापसे आणि गंगाधर बाचकर यांनी हातातील वस्तूंनी प्रतिकार केला. आरडाओरड केल्याने इतर नागरिक मदतीला धावले, त्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला. यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला, मात्र बिबट्याने गव्हाच्या शेतातून पळून लांब असलेल्या ऊसाच्या शेतात आसरा घेतला.

जखमी हापसे यांच्यावर मानोरी येथील डॉ. अजिंक्य आढाव यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले.
या घटनेमुळे मानोरीसह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: शेतकरी व वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने ग्रामस्थांच्या मागणीनुसार मानोरी गावात पिंजरा लावण्याचा निर्णय घेतला. बिबट्याने पलायन केलेल्या मकाच्या शेतात पिंजऱ्यात कोंबड्या ठेवून सापळा रचण्यात आला आहे.
सध्या सर्वत्र ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने शेतात लपण्याची ठिकाणे कमी होत चालली आहेत. त्यामुळे बिबट्यांनी मका, गिन्नी गवत आणि चाऱ्याच्या शेतांमध्ये आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही महिन्यांत राहुरी तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. यापूर्वीही अनेक शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून, तीन ते चार जणांना प्राण गमवावे लागले आहेत. वन विभागाने मानोरी येथे पिंजरा लावला असला तरी केवळ पिंजऱ्यांनी हा प्रश्न सुटणार नाही, असे ग्रामस्थांचे मत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.