२७ जानेवारी २०२५ नगर : नगर शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढलेला असून नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या जेऊर गावच्या परिसरात चापेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ‘रेस्क्यु ऑपरेशन’ राबवत बाहेर कडून जीवदान दिले आहे. २४ जानेवारीला दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० पर्यंत हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरु होते.बाहेर काढलेल्या बिबट्याला वनविभागाने जंगलात नेवून सोडून दिले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जेऊर गावच्या परिसरात असलेल्या चापेवाडी येथे डोंगराच्या कडेला सुरेश पाटोळे यांच्या शेतातील विहिरीत २४ जानेवारीला दुपारी ४ च्या सुमारास एक बिबट्या पडला.विहिरीत काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आल्याने परिसरात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना बिबट्या दिसला.ही माहिती त्यांनी जेऊर मधील वनमित्रांना दिली.
वन मित्र सनी गायकवाड, मायकल पाटोळे, सागर पाटोळे, संजय ठोंबरे, शशीकांत पवार यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती देत घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी विहिरी भोवती बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.अनेक जण विहिरीतील बिबट्याला दगड फेकून मारत होते.या वनमित्रांसह स्थानिक तरुण दीपक ठोंबरे अमित नांगरे, सुरज पवार, प्रसाद गोरे, हर्षल तोडमल, सुर्यकांत पवार आदींनी विहिरी भोवती जमा झालेली गर्दी हटवली.
त्यानंतर दोरीच्या सहाय्याने लाकडी शिडी विहिरीत सोडली.विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने आणि त्यात आधाराला काहीच नसल्याने बिबट्या पाण्यात पोहून थकला होता.या तरुणांनी सोडलेल्या लाकडी शिडीचा आधार बिबट्याने घेत त्यावर तो बसला.
काही वेळात वन विभागाचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले.या पथकाने स्थानिक तरुणांच्या सहाय्याने एक पिंजरा विहिरीत सोडला.पोहून थकलेला बिबट्या लगेच त्या पिंजऱ्यात बसला. त्यामुळे त्याला विहिरीतून वर काढणे सोयीचे झाले.त्याला वर काढल्यानंतर तो पिंजरा वनविभागाच्या पथकाने गाडीत घालून नेला.या बिबट्याला लांब जंगलात नेवून निसर्गात मुक्त केले जाणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी राबविलेल्या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, वनपाल मनेष जाधव, वनरक्षक विजय चेमटे, भागीनाथ पंचमुख, वाहनचालक संदिप ठोंबरे, अक्षय ससे आदी सहभागी झाले होते.
बिबट्याकडून पाळीव प्राण्यांची शिकार
या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. ज्या परिसरात बिबट्या विहिरीत पडला त्या परिसरात गेल्या काही दिवसांत बिबट्याने शेतकरी, मेंढपाळ यांच्या अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केलेली आहे.
यामध्ये भिवा घुले या मेंढपाळाच्या ३ मेंढ्या, चांगदेव कोकाटे या शेतकऱ्याची गाय, बापू म्हस्के यांची शेळी तसेच एका पाळीव कुत्र्याचा बिबट्यांनी फडशा पाडलेला आहे.वन विभागाने एक बिबट्या येथून पकडून नेला असला तरी या परिसरात अनेक बिबटे असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.