भाविकांची लूट करणे भोवले, २०० रुपयांचा हार प्रसादास ९०० रुपयांना विकला : नगरपालिकेने केले दुकान सील

Published on -

अहिल्यानगर : जिल्ह्यातील प्रसिध्द असलेल्या तिर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त शिर्डीत दाखल होत असतात. श्रद्धेने हे भक्त साई चरणी हार व प्रसाद अर्पण करतात. मात्र, काही दुकानदार या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असून मूळ किमतीच्या दहापट अधिक किमतीत प्रसाद व हार विकत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, लुट करणाऱ्या दुकानांवर जाऊन त्यांना जाब विचारला आणि नगरपालिकेच्या सहकार्याने ही दुकाने सील केली आहे.
शिर्डीत काही ठिकाणी प्रसादाच्या पाकिटांवर कोणतेही विक्री मूल्य छापील नसल्याने भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे उघड झाले. भाविकांच्या तक्रारीनंतर संबंधित दुकानदारां विरोधात शुक्रवारी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येत्या रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डी ग्रामस्थ आणि साई संस्थानच्या अधिकाऱ्यांची बैठक साई मंदिर परिसरात पार पडली.
यावेळी नागपूर येथून आलेल्या एका गरीब कुटुंबास २०० रुपयांच्या हार प्रसादासाठी ९०० रुपये मोजावे लागले, अशाप्रकारे संबंधित कुटुंबाची आर्थिक लूट झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दुकानांवर धडक मारली आणि नगरपालिकेच्या मदतीने ते दुकान सील केले. चौकशीत आणखी काही भाविकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. परिणामी, तीन दुकाने सील करण्यात आली असून, संबंधित दुकानदार आणि भाविकांना दुकानांकडे नेणाऱ्या पॉलिशी एजंटांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.शिर्डीतील काही हार व प्रसाद विक्रेते आणि एजंट भाविकांची लूट करत असल्याने ग्रामस्थांनी इतर दुकानदारांना यापुढे अशा प्रकारावर कठोर कारवाई होईल, असा इशारा दिला आहे. या कारवाईमुळे भाविकांची होणारी लूट थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News