अहिल्यानगर : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी जंगलांना वणवा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यात मोठी वनसंपदा नष्ट होत आहे. जिल्ह्यातील नवनाथांची भूमी म्हणून ओळख असलेल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील वनविभागाच्या जंगलाला मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घोरदरा पाझर तलाव परिसरात आग लागली.
या आगीने काही वेळातच रुद्ररूप धारण केल्याने जंगलातील अनेक छोटे मोठे झाड झुडुप सरपटणारे प्राणी पशुपक्षी यांना देखील या आगीच्या झळा सोसाव्या लागल्या. मंगळवारी रात्री लागलेल्या आगीमध्ये वनविभागाचे नेमकी किती हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले याची माहिती मिळाली नाही.

तरी रात्री लागलेल्या आगीमध्ये वन विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक झाडांची राख रांगोळी झाली आहे. दरवर्षीच करंजी दगडवाडी या परिसरातील जंगलाला आग लागून मोठ्या प्रमाणात वनविभागाचे नुकसान होत आहे.
त्यामुळे आग लागते का लावली जाते याबाबत देखील आता वनविभागाने सखोल चौकशी करून याबाबतची वस्तूस्थिती जाणून घेतली पाहिजे. वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे निसर्गाचं आणि जंगलातील जीवसृष्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
आग लागल्याची माहिती करंजी गावच्या काही ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी काही वेळात आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही आग विझवण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह निसर्गप्रेमींना यश आले.
करंजीच्या जंगलाला लागलेली आग एवढी मोठी होती तिसगावपर्यंत या आगीचे डोंब ठळकपणे दिसून येत होते. त्यामुळे तिसगाव, पाथर्डी ,अहिल्यानगर येथील पर्यावरण संवर्धन व संरक्षण चळवळीच्या अनेक कार्यकर्त्यांसह उपस्थित अनेकांनी जीवाची पर्वा न करता जंगलाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने रात्री एक वाजता ही आग आटोक्यात आली.