Ahilyanagar News:अहिल्यानगरमध्ये उभा राहणारा तब्बल १ हजार कोटींचा प्रकल्प विरोधामुळे दौंडला जाण्याची शक्यता! हजारो तरूणांच्या रोजगाराच्या संधी मिळाल्या धूळीस!

निमगाव खलूतील शेतकऱ्यांचा कडाडून विरोधामुळे तमिळनाडूतील दालमिया सिमेंट कंपनी दौंड तालुक्यात प्रकल्प उभारण्याचा विचार करत आहे. स्थानिक शेतकऱ्यांची जमीन नापिक होण्याची भीती आणि प्रदूषणाच्या दहशतीमुळे हा निर्णय घेण्यात आला.

Published on -

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील निमगाव खलू येथे प्रस्तावित असलेल्या दालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेडच्या सिमेंट प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने हा प्रकल्प आता दौंड तालुक्यात (जि. पुणे) स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूस्थित या कंपनीने भीमा नदीच्या बागायती पट्ट्यात सुमारे ८३ एकर जागेवर एक हजार कोटी रुपये गुंतवणुकीसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिमेंट प्रकल्प उभारण्याची योजना आखली होती.

मात्र, शेतकऱ्यांनी प्रदूषण आणि जमिनीच्या नापिकीच्या भीतीने एकजुटीने विरोध केल्याने कंपनीने दौंड तालुक्यात नवीन जागेचा शोध सुरू केल्याचे समजते. या घटनेमुळे शेतकरी आणि कंपनी यांच्यातील तणाव पुन्हा चर्चेत आला आहे.

महाराष्ट्रातीस सर्वात मोठा सिमेंट प्रकल्प

निमगाव खलू येथील प्रस्तावित सिमेंट प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिमेंट प्रकल्प ठरणार होता. कंपनीच्या दाव्यानुसार, या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असत्या आणि परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली असती. हा प्रकल्प ग्राइंडिंग युनिट असून, येथे कच्चा माल आणून त्याचे बारीक दळण करून तयार माल बनवला जाणार होता.

कंपनीने जपान तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प पर्यावरणपूरक असेल आणि रासायनिक प्रक्रिया नसल्याने प्रदूषण होणार नाही, असा दावा केला होता. तसेच, शेजारील तालुक्यांमध्ये असे दोन प्रकल्प यशस्वीपणे सुरू असून, त्यांचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत, असेही कंपनीने स्पष्ट केले होते.

स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध

मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला. भीमा नदीच्या बागायती पट्ट्यातील हा प्रकल्प शेतीसाठी धोकादायक ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सिमेंट प्रकल्पामुळे जमीन नापीक होईल, पाण्याचे स्रोत दूषित होतील आणि प्रदूषण वाढेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या हरकतीच्या सुनावणीत शेतकऱ्यांनी कंपनीची कोणतीही माहिती ऐकून घेण्यास नकार दिला. शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की, हा प्रकल्प स्थानिक शेती आणि पर्यावरणाला हानी पोहोचवेल. यामुळे शेतकरी आणि तरुणांनी एकजुटीने आंदोलन करत प्रकल्पाला विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी कंपनीच्या दाव्यांवर विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.

प्रकल्प दौडला जाण्याची शक्यता

कंपनीने शेतकऱ्यांना समजावण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना जपान तंत्रज्ञानावर आधारित प्लँट पाहण्यासाठी समिती नेमण्याचे आवाहन केले होते. तसेच, शेतकऱ्यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती घेऊन मगच विरोध करावा, असेही सुचवले होते. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध कायम राहिल्याने कंपनीने निमगाव खलू येथे प्रकल्प उभारण्याचा विचार मागे घेतला आहे. आता कंपनीने दौंड तालुक्यात नवीन जागेचा शोध सुरू केल्याचे समजते. लवकरच हा प्रकल्प दौंड येथे उभारला जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते, काही व्यक्ती स्वार्थासाठी या प्रकल्पाला विरोध करत असून, शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe