१० कोटींचा रस्ता एका पावसाळ्यात उखडला; पैशांचा चक्काचूर की भ्रष्टाचाराचा कहर?

Published on -

कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मागील वर्षी तब्बल १० कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, पण अवघ्या एका पावसाळ्यातच त्याची वाताहत झाली आहे. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत, डांबराचा थर उखडला आहे, तर काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला आहे.

या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीवाला धोका पत्करण्यासारखे बनले आहे. गणपती मंदिर, माजी आमदार के. बी. रोहमारे वस्ती, बहादराबाद, अंजनापूर, रांजणगाव देशमुख अशा अनेक ठिकाणी रस्त्याची स्थिती बिकट आहे, जिथे खड्डे आणि खचलेल्या जागांमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिक आणि वाहनचालकांमध्ये या परिस्थितीमुळे प्रचंड संताप आहे. प्रशासन जनतेच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल ते उपस्थित करत आहेत. पावसाळ्यात डांबर उपलब्ध नसल्याचे कारण देऊन प्रशासन दरवर्षी कामाला चालढकल करते, तर पावसाळा संपल्यानंतरही आठ महिने कामाला सुरुवात होत नाही.

वर्षानुवर्षे कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची अवस्था सुधारत नाही. परिणामी, हजारो नागरिकांना रोजच्या प्रवासात अडचणी आणि धोके सहन करावे लागत आहेत. दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला असताना रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागेल, अशी भीती नागरिकांना आहे.

नुकतेच ठेकेदाराने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला, पण हे काम म्हणजे केवळ ठिगळं लावण्यासारखे झाले आहे. रस्ता कुठेही समतल नाही; तो उंचसखल आणि धोकादायक बनला आहे. शिवाय, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण आणि साईड पट्ट्यांचे काम अपूर्ण आहे. चर उकरलेले नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही, ज्यामुळे रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले आहे.

कोपरगाव मतदारसंघात विधानसभेच्या रस्त्यांसाठी निधी मंजूर होऊनही कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट राहिला आहे. निधीचा योग्य विनियोग होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, प्रशासनाच्या दक्षता आणि गुणनियंत्रण विभागाकडून कामांची तपासणी होत नसल्याचा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe