अहिल्यानगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्या जन्मगावी, चौंडी येथे पहिल्यांदाच २९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी तात्पुरत्या सुविधा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे १५० कोटी रुपये खर्चाची निविदा जाहीर केली आहे.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चौंडीतील सभेसाठी केवळ १२ लाख रुपये खर्च झाले होते. पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी इतका कमी खर्च झाला असताना, मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी एवढा मोठा निधी का वापरला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

मंत्रिमंडळाची बैठक
मध्य प्रदेश सरकारने अहिल्यादेवींच्या सासुरवाडी असलेल्या महेश्वर येथे त्यांच्या जयंतीनिमित्त मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने चौंडीत बैठक घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौंडीला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. निविदा भरण्यासाठी २१ ते २३ एप्रिल ही मुदत देण्यात आली असून, २४ एप्रिलला सायंकाळी ६ वाजेपर्यंत निविदा उघडल्या जातील.
रस्त्यांची दुरावस्था
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. मात्र, अरणगाव ते चौंडी आणि नगर-करमाळा या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २० कोटींचा निधी मंजूर असूनही कामाला सुरुवात झालेली नाही. दुसरीकडे, मंत्रिमंडळाच्या केवळ तीन तासांच्या बैठकीसाठी तातडीने निविदा काढली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या खर्चावर विरोधकांनी टीकाही केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील जोडरस्त्यांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक रस्त्यांची कामे थांबली आहेत. राज्य मार्ग, रस्ते आणि पूल यांच्या कामांसाठी ६८.१३ कोटी रुपये थकीत आहेत, त्यामुळे कंत्राटदारांनी कामे बंद केली आहेत.
१०० कोटींच्या ग्रीन रूम, ५० कोटींचे कॅमेरे
१५० कोटींपैकी १०० कोटी रुपये खर्चून मंत्र्यांसाठी उन्हापासून संरक्षण देणारे ग्रीन रूम, मुख्य मंडप, स्टेज आणि प्रसाधनगृह उभारले जाणार आहेत. मंडपाच्या चारही बाजूंना बॅरिकेड्स लावले जाणार आहेत. उर्वरित ५० कोटी रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे, वातानुकूलन यंत्रणा, विद्युतीकरण, ध्वनियंत्रणा आणि अग्निशमन व्यवस्था उभारली जाईल.
बैठकीचे स्वागत मात्र एवढा खर्च करणे चुकीचे
खासदार नीलेश लंके म्हणाले, “अहिल्यादेवींच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याचे मी स्वागत करतो. पण त्यासाठी १५० कोटी रुपये खर्च करणे चुकीचे आहे. त्याऐवजी चौंडी येथील अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी हा निधी वापरावा. कंत्राटदार आत्महत्या करत आहेत, आणि लाडक्या योजनांच्या निधीत कपात होत आहे. अशा परिस्थितीत हा खर्च योग्य नाही.”