राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खटकळी परिसरातील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणाचा विजेच्या मुख्य तारेला स्पर्श होऊन झटका बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार घडली.
नारळाच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना ही घटना घडली असून विद्युत विरोधी साधने न देता हलगर्जीपणा करुन त्यास नारळाच्या फांद्या तोडण्यास लावल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खटकळी येथील रहिवासी असलेला मनोज दामोदर उमाप (वय ३०) हा झाडे तोडण्याचे तसेच मोलमजुरीचे काम करतो. शनिवारी देवळाली प्रवरा येथील राजवाडा चौकात नारळाची फांदी तोडत असताना विजेच्या मुख्य प्रवाह असलेल्या तारेला मनोज याचा चुकून हात लागल्याने तीव्र शॉक बसून तो खाली पडला.
त्यानंतर त्यास तातडीने रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय सूत्रांनी मृत म्हणून घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी दासू पठारे, पिंटू थोरात, कुमार भिंगारे, सचिन घोरपडे, प्रेम गायकवाड यांनी मदतकार्य केले.
मयत मनोज याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत मनोज हा सुरेश जयवंत पंडीत याच्याकडे नारळाचे फांदया तोडण्याच्या मजुरीच्या कामासाठी गेला होता.
त्यावेळी नारळाच्या झाडामधुन गेलेल्या वीजेच्या तारामध्ये विद्युत प्रवाह असताना त्याकरिता कोणतीही विद्युत विरोध साधने न देता हलगर्जीपणा करुन त्यास फांदया तोडण्यास लावल्याने तारामधुन मनोज यास विद्युत शॉक बसुन तो मृत्युमुखी पडल्याची फिर्याद मयत मनोज याचा भाऊ सुनील दामू उमाप याने राहुरी पोलिसात दिली आहे. सुरेश जयवंत पंडीत याच्या विरूद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.