अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आर्थिक संकटात पाडले आहे.
यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यातच महावितरणची एक चूक शेतकऱ्याला तब्बल २५ लाखांना पडली आहे. नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील खरवंडी पश्चिम शिवारात शेतातून गेलेल्या वीज प्रवाहातील ठिणगी ऊसाच्या शेतात पडल्याने परीसरातील तब्बल ४५ एकर क्षेत्राला आग लागून अंदाजे २५ लाखाचे नुकसान झाले आहे.
ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी रस्ता नसल्याने या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी पोहचू शकली नाही. यामुळे काही वेळातच हा ऊस डोळ्यादेखत जाळून खाक झाला. शनिशिंगणापुर वीज उपकेंद्रातून गणेशवाडी व खरवंडीसाठी असलेल्या विद्युत वाहिन्यांची मोठी दुरावस्था आहे.
याबाबत अनेकदा तक्रार करुनही दुर्लक्ष केल्याने हा मोठा अनर्थ घडल्याचे बोलले जात आहे. या जळीतामध्ये ठिबक सिंचन संचासह शेतातील जलवाहिन्या व शेती उपयुक्त साहित्याचे नुकसान झाले आहे. मुळा कारखान्याच्या शेतकी विभागासह वीज मंडळ विभागाने आज दुपारी भेट देवून पाहणी केली.
या नुकसानीचा २४ तासानंतरही पंचनामा झालेला नाही. वीज मंडळाच्या चुकीने हे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved