अतिक्रमणामध्ये टपरी काढली ! सलून व्यवसायिकाने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली…

Ratnakar Ashok Patil
Published:

अतिक्रमण कारवाईमुळे आपला व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने एका सलून व्यावसायिकाने नैराश्यातून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेवासा रस्त्यावरील जोहरापूर पुलाजवळील ढोरा नदीत उडी घेऊन पांडुरंग रामभाऊ शिंदे (वय 50) यांनी आत्महत्या केली. बुधवारी (दि. 19) ते बेपत्ता झाले होते, त्यानंतर आज शुक्रवारी (दि. 21) दुपारी त्यांचा मृतदेह नदीत सापडला. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पांडुरंग शिंदे हे शेवगाव शहरातील विद्यानगर भागात आपल्या कुटुंबासह राहत होते. शहरातील बसस्थानकाजवळ एक छोटीशी टपरी असलेले त्यांचे सलून व्यवसायाचे ठिकाण होते. गेल्या आठवड्यात महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाई केली आणि अनेक व्यावसायिकांच्या टपऱ्या हटवण्यात आल्या. याच कारवाईत शिंदे यांच्या सलून टपरीवरही हातोडा पडला आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा एकमेव स्रोत संपुष्टात आला. अचानक रोजगार गमावल्याने मानसिक तणावात असलेले शिंदे बुधवारी आपल्या घरातून निघून गेले होते. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता.

शुक्रवारी दुपारी, स्थानिक नागरिकांना जोहरापूर पुलाजवळील ढोरा नदीत एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. शेवगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि तो पांडुरंग शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात, अतिक्रमणामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणी आणि त्यातून निर्माण झालेल्या तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर शहरातील व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या अतिक्रमण कारवाईवर आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करत हतबलतेत आणखी किती व्यावसायिकांचे बळी जाणार, असा सवाल उपस्थित केला आहे. अतिक्रमण हटवताना पर्यायी व्यवस्था का केली जात नाही? आणि छोट्या व्यावसायिकांना पुन्हा उभे राहण्यासाठी काही उपाययोजना का केल्या जात नाहीत? अशा मागण्या उपस्थित होत आहेत.

शहरातील छोट्या व्यावसायिकांसाठी महापालिका आणि प्रशासनाने तत्काळ पुनर्वसन योजना आखावी आणि रोजगार गमावलेल्या लोकांसाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी देखील नागरिक आणि व्यापारी संघटनांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यासंदर्भात लवकरच निषेध मोर्चे काढण्याचा इशारा व्यावसायिक संघटनांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe