Ahmednagar News : श्रीरामपूर येथील रिमांड होम मध्ये राहून क.जे. सोमय्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलेला सागर अशोक चिलप या विद्यार्थ्यांने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहाय्यक कृषी अधिकारीपदी निवड होणे हि बाब गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे चेअरमन संजय छल्लारे यांनी केले.
हिंद सेवा मंडळाच्या येथील क.जे. सोमय्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सागर चिलप याची महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकारीपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने चेअरमन छल्लारे यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.
त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्रकार सुरेश कांगुणे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे, सेवक प्रतिनिधी कल्याण लकडे, योगेश देशमुख, पर्यवेक्षिका श्रीमती कांबळे, रिमांड होम अधीक्षक बढे, ढाकणे, श्रीमती चिलप यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
सागर चिलप हा दीड वर्षाचा असतानाच आकस्मित पितृछत्र हरपले. त्यामुळे त्याच्या आईने त्याला रिमांड होम, श्रीरामपुर येथे दाखल केले होते. त्याने सोमय्या हायस्कूल येथे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जिद्द व चिकाटीच्या जोरावर मेहनत करून पुढील महाविद्यालयीन पदवी शिक्षण पुणे येथे केले.
त्यानंतर त्याने राहुरी कृषी विद्यापीठ येथे कृषी अभ्यासाचे धडे गिरवले आणि कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून परीक्षा देऊन निवड झाली आहे. सोमय्या विद्यालयातील शिक्षकांनी आपली निवड झाल्याबद्दल सत्कार केल्याने मनोधैर्य उंचावले असल्याचे चिलप यांनी व्यक्त केले.