अहिल्यानगर – माता मृत्यू व नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी महानगरपालिका उपाययोजना करत आहे. गडचिरोली येथे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटवण्यासाठी डॉ. अभय बंग यांनी निर्माण प्रकल्प राबवून प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. त्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊन, अहिल्यानगर शहरातही अधिक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक दर तीन महिन्यांनी गडचिरोली येथील अभ्यास दौर्यावर जाईल, असा निर्णय महानगरपालिकेने घेतल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आरोग्य विषयक उपाययोजना व उपक्रमांमध्ये सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. माता मृत्यू रोखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्व आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरातील गरोदर मातांची माहिती संकलित करावी. त्यांची भेट घेऊन संस्थेत त्यांची नोंदणी करून घ्यावी. त्यांचे योग्य समुपदेशन करावे. आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या करून त्यांना वेळेत योग्य उपचार मिळतील, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच, शहरातील नागरिकांनीही त्यांच्या घरातील गरोदर महिला असल्यास महापालिकेच्या आरोग्य केंद्रात, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात संपर्क साधावा. वेळेत तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
तसेच, माता मृत्यूसह नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. गडचिरोली येथे डॉ . अभय बंग यांनी निर्माण प्रकल्प राबवून केलेल्या प्रभावी उपाययोजनामुळे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटले आहे. त्यांनी काय उपाययोजना केल्या याची माहिती घेण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचे एक पथक गडचिरोली येथे जाऊन माहिती घेतील. त्यानुसार अहिल्यानगर शहरातही उपाययोजना केल्या जातील.
आरोग्य विषयक उपाययोजनामुळे फेब्रुवारीत महानगरपालिकेचा राज्यात सहावा क्रमांक आला आहे. आपल्या कामगिरीत सुधारणा होत असली, तरी या वर्षात पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवणे हे आपले उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. दरम्यान, आरोग्य दिनानिमित्त त्यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.