कंटेनरच्या भीषण अपघातात टोलनाका भूईसपाट छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील घटना

Published on -

अहिल्यानगर : छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील जेऊर शिवारातील बंद पडलेले टोल गेट वारंवार अपघाताला निमंत्रण देत असल्याने ते हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत होती परंतु संबंधितांकडून या मागणीकडे कायमच दुर्लक्ष झाले त्यामुळे बंद असलेल्या टोल गेटला धडकून अनेक अपघात घडत होते गुरुवारी मध्यरात्री कंटेनरच्या झालेल्या अपघातात टोल गेट भुईसपट झाले आहे. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर शिवारात टोल नाका उभारण्यात आला होता. टोल नाक्याची मुदत संपल्यानंतर देखील सदर ठिकाणचे टोल गेट हटविण्यात आले नव्हते. सुमारे आठ वर्षे उलटून देखील टोल गेट हटविण्यात येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. सदर ठिकाणी टोल गेटच्या दुभाजकाला धडकून अनेक अपघात घडत होते व घडलेले आहेत. त्यामुळे येथील टोल गेट हटविण्याची मागणी जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत होती.

टोल गेट हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप देखील नागरिकांकडून होत आहे. अखेर गुरुवारी रात्री कंटेनरने दिलेल्या धडकेत एका बाजूचे टोलगेट भुईसपाट झाले आहे. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजी नगर कडे लोखंडाचे रोल घेऊन जाणाऱ्या कंटेनरने (क्र. एम. एच.४६ सी. एल. ५७४०) कोलगेटच्या लोखंडी पोलला जोराची धडक दिल्याने टोल गेटचे छत महामार्गावर कोसळले. अपघातानंतर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe