शिर्डी – ज्येष्ठ अभिनेते आणि ‘शिर्डी के साईबाबा’ या अजरामर चित्रपटाचे निर्माते मनोजकुमार यांच्या निधनाने शिर्डीतील साईभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर शिर्डीच्या साई संस्थान तर्फे साईबाबांची शाल, फुलांचा हार व चंदनाचे लाकूड अर्पण करण्यात येणार आहे.
साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार, प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले यांना शिर्डी संस्थानचे प्रतिनिधी म्हणून अंत्यदर्शनासाठी पाठवण्यात आले आहे.

मनोजकुमार व शिर्डीचे अतूट नाते
1956 च्या सुमारास पहिल्यांदा शिर्डीत आलेल्या मनोजकुमार यांचे साईबाबांशी अतूट श्रद्धेचे नाते जडले. त्यांनी बोटात घातलेली चांदीची साई अंगठी हा त्यांचा श्रद्धेचा पुरावा होता, ज्यात ते वेळोवेळी चांदीची भर टाकून ती नेहमी वापरत असत.
1977 मध्ये त्यांच्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटाने साईबाबांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर अजरामर केला. सत्यसाईबाबांच्या सूचनेनुसार तयार झालेल्या या चित्रपटामुळे शिर्डीला एक नवी ओळख मिळाली.
विशेष म्हणजे 13 नोव्हेंबर 1977 रोजी दिवाळीत, या चित्रपटाच्या प्रभावाने शिर्डीत झालेल्या भाविकांच्या गर्दीचा उच्चांक आजही आठवला जातो.
शिर्डीच्या विकासात मोलाचे योगदान
१९८३ मध्ये ‘साईबाबा इंटरनॅशनल’ हॉटेलचे उद्घाटनही मनोजकुमार यांच्या हस्ते झाले होते. साईनाथ हॉस्पिटलमध्ये १९९३ मध्ये त्यांनी आयसीयू युनिटसाठी दिलेल्या मदतीमुळे शिर्डी परिसरात ही आरोग्यसेवा प्रथमच उपलब्ध झाली.
त्याचप्रमाणे, २००० साली ‘साईसमर्थ पतसंस्था’ सुरू करताना त्यांच्या सत्कारासाठी शिर्डीतील नागरिकांनी मिरवणूक काढली होती आणि ‘साईरत्न’ पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता.
शिर्डीच्या पिंपळवाडी रोडचे नामकरण १५ मे २००६ रोजी ‘मनोजकुमार पथ’ असे करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले होते.
शिर्डीकरांनी वाहिली श्रद्धांजली
शिर्डीकर आणि साई संस्थानने साईशताब्दी मंडपात आयोजित केलेल्या शोकसभेत मनोजकुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शिर्डीने त्यांचे नाव रस्त्यावर कोरून ठेवले, तर त्यांच्या कार्यातून शिर्डीचे नाव देशभर पोहोचले.
“साईबाबांवरील चित्रपटाच्या माध्यमातून मनोजकुमार यांनी शिर्डीच्या भूमीशी जोडलेले नाते अतूट राहिले.”
— राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री
“‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटामुळे देशभरात साईबाबांविषयी श्रद्धा वाढली. त्यांना संस्थानतर्फे विनम्र श्रद्धांजली.”
— गोरक्ष गाडीलकर, सीईओ, साई संस्थान
मनोजकुमार यांच्या निधनाने साईभक्तांचा एक प्रिय दूत हरपला असला तरी, त्यांच्या योगदानामुळे शिर्डीचे नाव जगभर पोहोचले, आणि श्रद्धेच्या या प्रवाहात त्यांचे योगदान कायम अजरामर राहील.