अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- शहरातील रस्ते खड्ड्यांनी खुळखुळे झाले असताना पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने विजयादशमीला म्हणजेच आज दि.15 ऑक्टोबरला महापालिकेचे नामांतर ढब्बू मकात्या महापालिका करुन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देखील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते नाहीत. पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते वाहून गेले असून, झालेल्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे.
याचा हा निषेध असून अमरधामवर महापालिकेच्या नामांतर फलक लाऊन आंदोलन केले जाणार असून, या आंदोलनात स्वयंसेवी संघटना व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन अशोक सब्बन यांनी केले आहे. दरम्यान शहरातील निकृष्ट रस्त्यांना जबाबदार ढब्बू मकात्या प्रवृत्ती आहे.
ढब्बू म्हणजे कालबाह्य झालेले नाणे व मकात्या प्रवृत्ती म्हणजे मला काय त्याचे? होईल ते होऊ द्या. ही प्रवृत्ती स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुध्दा पोसली गेली.
यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळून रस्त्यांची निकृष्ट कामे झाली. टक्केवारीमुळे रस्त्यांचा दर्जा चांगला राहिला नसून, सर्वच रस्ते खुळखुळे झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
प्रशासनात अनागोंदी, भ्रष्टाचार, टोलवाटोलवी, टक्केवारी अनुभवयास मिळत असल्याचे ऍड. कारभारी गवळी यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेत कोट्यवधी रुपयांची टक्केवारी, भ्रष्टाचार असल्यामुळे नगर शहराच्या रस्त्यांचा खुळखुळा झाला असल्याचे सब्बन यांनी म्हंटले आहे.
ढब्बू मकात्या प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी व नागरिकांमध्ये जागृकता निर्माण होण्याच्या दृष्टीने संघटनेच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम