अहिल्यानगर जिल्ह्यातील शिरापूर हे सुमारे ४ हजार लोकवस्तीचे गाव, गेल्या ३० वर्षांपासून शांततेचा आणि एकतेचा आदर्श निर्माण करत आहे. ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होणे ही या गावाची खासियत ठरली आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे निवडणुकांमुळे होणारे वाद, भांडणं किंवा द्वेषभावना येथे आढळत नाहीत, यामुळे शिरापूरमध्ये सलोख्याचे वातावरण आहे आणि विकासाला प्राधान्य दिले जाते.
१९९५ पासून सुरु झालेली परंपरा
पारनेर तालुक्यातील शिरापूरमध्ये ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे शेवटचे मतदान १९९५ साली झाले होते. त्यानंतर, निवडणुकीची घोषणा होताच ग्रामसभा बोलावली जाते आणि बिनविरोध उमेदवारांची निवड केली जाते. ग्रामपंचायतीसाठी ११ आणि सहकारी संस्थेसाठी १३, अशा एकूण २४ जागांसाठी उमेदवार सर्वानुमते ठरवले जातात. या प्रक्रियेत वेगवेगळ्या व्यक्तींना संधी दिली जाते, यामुळे गावातील सर्व समाजघटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित होते.

महिलांना संधी
२०१० मध्ये गावाने महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देत १९ महिलांना ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून दिले होते. यावेळी गावाने एक महत्त्वाचा नियम लागू केला – महिलांच्या पतींनी ग्रामपंचायतीच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही. महिलांनी गावाचा कारभार उत्कृष्टरीत्या हाताळल्याच्या आठवणी आजही ग्रामस्थांना अभिमानाने सांगाव्याशा वाटतात.
विकास प्राधान्यक्रम
ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या बिनविरोध निवडणुकांमुळे गावात विकासासाठी एकमताने निर्णय घेणे शक्य होते. यामुळे वादांना फारसे स्थान नसते आणि विकासकामांना वेग येतो. सरपंच भास्कर उचाळे आणि उपसरपंच संतोष शिनारे सांगतात की, “विरोधासाठी विरोध करण्याचे प्रकार गावात होत नाहीत, यामुळे गावातील प्रत्येक विकास प्रकल्प वेळेत पूर्ण होतो.
शांततेतून कुस्तीप्रेमाचा नाद
शिरापूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण अत्यंत कमी असून, तरुणांना कुस्ती खेळण्याचा विशेष नाद आहे. गावातील अहिल्यानगरचा कुस्ती आखाडा जिल्ह्यातील सर्वात मोठा मानला जातो. दरवर्षी येथे भरणाऱ्या कुस्ती स्पर्धांमध्ये नामवंत पहिलवान हजेरी लावतात. गावातील सलोख्याचे वातावरण विविध उत्सव आणि यात्रांमध्ये देखील दिसून येते, जिथे संपूर्ण गाव एकत्र येतो.
एक आदर्श गाव
पारनेर तालुक्यातील शिरापूरमध्ये निवडणुका बिनविरोध होण्याच्या परंपरेने गावाला विकासाची दिशा दिली आहे. राजकीय गट-तट नसल्यामुळे गावात शांतता आहे आणि सामाजिक एकोपा टिकून आहे. गावातील सलोख्याच्या वातावरणामुळे शिरापूर इतर गावांसाठी एक आदर्श ठरले आहे. शिरापूरची ही परंपरा फक्त स्थानिक विकासासाठीच नाही तर सामाजिक शांततेसाठीही महत्त्वपूर्ण उदाहरण बनली आहे.