शिलेगाव येथे तरुणाचा खून, विहिरीत हातपाय बांधलेला मृतदेह आढळला

Published on -

Ahmednagar News : तालुक्यातील शिलेगाव येथे पाच ते सहा जणांनी मिळून विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करुन त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याला मुळा नदीपात्रातील एका विहिरीत टाकून त्याचा खून केला आहे. काल बुधवारी (दि. १५) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे मुळानदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत काल बुधवारी सकाळी लाकडी दांडे, चप्पल तसेच एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, विकास साळवे, रोहित पालवे, संतोष राठोड, भाऊसाहेब शिरसाठ, गणेश लिपने आदी पोलीस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने बाजेवर ठेवून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सदर मृतदेह हा विजय अण्णासाहेब जाधव (वय ३०, रा. आरडगाव, बिरोबानगर), याचा असल्याचे निष्पन्न झाले. विजय जाधव हा मंगळवारी (दि.१४) कामावर गेला होता. त्यानंतर तो त्याच्या मित्रांबरोबर शिलेगाव येथील यात्रेत गेला.

यात्रेत विजय जाधव याचे मित्रांबरोबर भांडण झाले. त्यावेळी त्याच्या मित्रापैकी चार ते पाच जणांनी विजय जाधव याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली होती, अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर काल बुधवारी सकाळी विजय जाधव याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह, लाकडी दांडे व चप्पल विहिरीतील पाण्यात आढळून आल्या. मयत विजय जाधव याच्या नातेवाईकांनी एका संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. विजय जाधव याचा खून कोणत्या कारणातून व कोणी केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेबाबत काल बुधवारी दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. विजय जाधव याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, सहा भाऊ, असा मोठा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!