१३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पत्नीशी भांडण झाल्यामुळे मित्राच्या रुमवर राहत असलेला एक तरुण मित्रासोबत बोलून बाहेर गेला.तो परत आलाच नाही. त्याचा दगडाने ठेचून निघूण खून झाल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आले.ही घटना नागापूर एमआयडीसी परिसरात शनिवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली.
अश्विन मारुती कांबळे (वय ३२, रा. गणेशनगर, एमआयडीसी, मूळ रा. निपाणी, बेळगाव, कर्नाटक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.नगर-मनमाड रोडवरील बोल्हेगाव फाट्याजवळ असलेल्या एका ट्रॅक्टरच्या शोरूम शेजारी असलेल्या पुलाच्या खालच्या बाजूस मोकळ्या जागेत कांबळे याचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला.
ही माहिती मिळताच एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी हे पोलिस पथकासह घटनास्थळी गेले.घटनास्थळाची पाहणी करून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्यांनी तपास सुरु केल्यावर सदर मृतदेह हा अश्विन मारुती कांबळे याचा असल्याचे निष्पन्न झाले.
तो एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होता.त्याचे पत्नीशी वाद झाल्याने तो मित्राच्या रूमवर राहत होता.शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता तो मित्राशी बोलून घराबाहेर पडला होता, त्यानंतर रात्रभर त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नव्हता.सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.
त्याचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खून केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस अधिक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक लॅबचे तज्ञ आदींनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.पोलिसांनी शव विच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. दुपारी उशिरा या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजची पाहणी
या खुनाचा तपास पोलिसांनी सुरु केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली आहे.तसेच मयताचे कोणाबरोबर वाद होते का याचाही तपास केला जात आहे.काही संशयितांकडेही पोलिसांनी चौकशी केल्याचे सांगण्यात येते.
एमआयडीसी परिसर गुन्हेगारांचा अड्डा
एमआयडीसी परिसरात नेहमीच अगदी छोट्या-छोट्या कारणांवरुनही खुनाची प्रकरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत.एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.छोट्या टपऱ्या या गुन्हेगारांचे आश्रयस्थान असून, पोलिस मात्र कारवाईकडे दुर्लक्ष करीत आहेत.
बोल्हेगाव, नागापूर, नवनागापूर परिसरात अनेक सराईत गुंड हे अवैध व्यवसाय चालवत असल्याचे तसेच चोर-लुटारुंचे देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे सांगण्यात येते.