Ahmednagar News : येथील नगरपरिषदेस शेती महामंडळाची १० हेक्टर ६० गुंठे क्षेत्र विना मोबदला देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय नुकताच घेतला आहे.
त्यामुळे शहरातील सांडपाणी प्रकल्प व गरिबांसाठी लागणाऱ्या घरकुलाच्या जागेसह सरकारी कार्यालय व कर्मचारी निवासस्थान यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१/ २०२३ अन्वये कलम २८.१ अ मधील केलेल्या सुधारण्याच्या अनुषंगाने ८ फेब्रुवारी २०२४ रोजी याबाबत शेती महामंडळाच्या जमिनी विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेने दिलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. शेती महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेला निर्णय शासनाकडे सादर करण्यात आला.
याबाबत (दि.११) मार्च २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वसामान्य जनतेसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी केला जाणार असल्याने लोकोपयोगी व सार्वजनिक सुविधा विचारात घेता प्रस्तुत जमिनी प्रदान करण्याची बाब मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आली.
काल गुरूवारी (दि.१३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीरामपूर नगरपरिषदेसाठी गट नं. ४७/३८ व गट नं. ४७/३९ मधील एक हेक्टर ४० आर क्षेत्र दक्षिणेकडील सांडपाणी प्रकल्प व गट नं. ७३ मधील ८ हेक्टर ४० आर घरकुलांसाठी व गट नंबर ७४ मधील क्षेत्र ८० आर हे शासकीय कार्यालय व कर्मचारी निवासस्थानासाठी देण्यात आले,
असे एकूण १० हेक्टर ६० आर क्षेत्र श्रीरामपूर नगरपरिषदेस विना मोबदला देण्यात आले. याबाबत माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या कार्यकाळात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याचा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडेही त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे सहकार्य लाभले.
तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे सहकार्य लाभले.