Ahmednagar News : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे आमदार नीलेश लंके यांनी लक्ष वेधून या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. विविध प्रश्नांवर स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात येऊन हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देऊ, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या वेळी दिली.
सध्या शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा प्रचंड बोजा पडत असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेळ मिळत नाही. सध्या शिक्षकांना बीएलओचे काम देण्यात आले असून, या कामातून शिक्षकांची मुक्तता करण्यात यावी,
नव्याने सुरू होत असलेल्या साक्षर योजनेसाठी सर्वेक्षक म्हणून शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या कामांतूनही शिक्षकांना वगळण्यात यावे. नव नवीन अॅप्सच्या माध्यमातून कामाचा प्रचंड भडीमार शिक्षकांवर होत असून, ही ऑनलाईन कामेही थांबविण्यात यावीत, अशी शिक्षकांची मागणी असल्याचे आ. लंके यांनी मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले.
जिल्हा परिषदेमध्ये रिक्त केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी या पदांवर उच्च शैक्षणिक पात्रताधारक एम. एड. शिक्षकांना सामावून घेण्यात यावे, यासाठी १९६७ चा शासन निर्णय दुरुस्त करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी,
विज्ञान पदवीधर शिक्षकांना बी एसस्सी पुर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, बदलीची गरज असलेल्या शिक्षकांसाठी ऑनलाईन बदल्या करण्यात याव्यात, शिक्षकांचे पगार दरमहा एक तारखेला करण्यात यावेत, शिक्षकांना मुख्यालयाची सक्ती करण्यात येत असून, अशी सक्ती करण्यात येऊ नये.
शिक्षक भरती सुरू करावी, आदी शिक्षकांच्या मागण्यांबाबत आ. लंके यांनी मंत्री दीपक केसरकर यांना अवगत केले. शिक्षकांच्या प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही या वेळी मंत्री केसरकर यांनी आ. लंके यांना दिली. वनकुटयाचे माजी लोकनियुक्त सरपंच अॅड. राहुल झावरे हे आ. लंके यांच्यासमवेत होते.
शिक्षिकेच्या न्यायासाठी आंदोलनाचा इशारा नेरूळ, नवी मुंबई येथील शिक्षिकेवर तेथील शिक्षण संस्थेकडून अन्याय करण्यात आला असून, सेवेतून कमी करण्यात आले आहे. या शिक्षिकेवरील अन्याय दूर करण्यासाठी आपण अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत असून, त्याची अद्यापी दखल घेण्यात आलेली नाही.
येत्या १० दिवसांत शिक्षण संस्था चालक तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून या भगिनीस न्याय द्यावा अन्यथा न्याय मिळेपर्यंत आपण मंत्री केसरकर यांच्या दालनात आंदोलन करणार असल्याचे निवेदन आ. लंके यांनी केसरकर यांना दिले आहे.