४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शेतकऱ्यांना अखंडित वीज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली असून प्रकल्पांच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्ह्यातील सौर प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस पोलीस अधीक्षक राकेश ओला (दूरदृश्यप्रणालीद्वारे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.सालीमठ म्हणाले, जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथे दोन ते तीन दिवसात काम सुरू करावे.कर्जत तालुक्यातील बेलवंडी येथील जुन्या गावठाणातील जागा सौर प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा आणि संस्थेने तेथील काम तातडीने सुरू करावे.याच बांभोरा उपकेंद्राच्या परिसरात १० मेगावॅट प्रकल्पासाठी ३० एकर जागा निश्चित करण्यात यावी.
शासकीय सौर प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांवर आवश्यक कारवाई करावी.जामखेड तालुक्यातील खर्डा येथे तांत्रिक अडचणी असल्याने वाकी आणि नायगाव येथील जागेला भेट देऊन प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने पाहणी करावी.राहाता तालुक्यातील केळवड येथील प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे.या ठिकाणी जागेची उपलब्धता लक्षात घेऊन ५ मेगावॅट पेक्षा अधिक वीज निर्मितीसाठी प्रयत्न करावे.
अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव प्रकल्पाचे काम सुरू करावे,त्या जागेकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रस्ताव तयार करावा.श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी येथील नागरिकांशी संवाद साधून काम सुरू करण्यात यावे.शेवगाव तालुक्यातील दहिगाव, शहर टाकळी परिसरात प्रकल्पासाठी जागेचा शोध घेण्यात यावा.
खापरेवडी, हकलापूर, राहाता, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, श्रीरामपूर सूतगिरणी परिसर, राहुरी तालुक्यातील वांबोरी, पारनेर मधील लोणी मावळा, जावळा , राळेगाव, नेवासा एमआयडीसी, संगमनेर मधील पेमगिरी, कोपरगाव तालुक्यात चास,आणि जामखेड तालुक्यातील राजुरी येथे देखील जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी,अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
संबंधित संस्थेने भाडेतत्त्वावर खासगी जागेचा शोध घ्यावा, प्रशासनातर्फे समन्वय साधण्यासाठी सहकार्य करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.सौर प्रकल्पाची कामे करतांना सुरक्षेच्या दृष्टीने समस्या येऊ नयेत यासाठी पोलिसांचे सर्व सहकार्य राहील असे पोलीस अधीक्षक श्री.ओला यांनी सांगितले. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथे प्रकल्पाचे काम सुरू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.