११ मार्च २०२५ श्रीरामपूर : हरेगाव येथील मागासवर्गीय तरुणांना मारहाण झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. या घटनेतील मुख्य फिर्यादी शुभम माघाडे आणि त्यांचे सासरे भानुदास गायकवाड यांचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने नवीन संशय निर्माण झाला आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिस तपास सुरू असून, सीसीटीव्हीच्या मदतीने वाहनाचा शोध घेतला जात आहे.
रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शुभम माघाडे आणि भानुदास गायकवाड हे हरेगावहून श्रीरामपूरकडे दुचाकीवरून येत होते. यावेळी एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,

तर माघाडे गंभीर जखमी झाले. प्रथम त्यांना श्रीरामपूरच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगर येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताला एक वेगळा संदर्भ आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये हरेगाव येथे कबूतर चोरीच्या संशयावरून चार मागासवर्गीय तरुणांना झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि शुभम माघाडे हा या प्रकरणाचा मुख्य फिर्यादी होता.
शहर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, मात्र अपघातातील परिस्थिती संशयास्पद असल्याने, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. ज्या मार्गावर अपघात झाला, त्या ठिकाणी रहदारी कमी असते. त्यामुळे हा केवळ अपघात आहे की सुडाने घडवलेली घटना, याचा शोध घेतला जात आहे.