महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आरोपीस अटक !

Published on -

अकोले, २० मार्च २०२५: महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून आंबड (ता. अकोले) येथील गवनेर सरोदे यास अकोले पोलिसांनी बुधवारी पहाटे पुण्यात अटक केली. अकोले न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी नरेंद्र रामभाऊ भोर (रा. आंबड) यांनी अकोले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गवनेर सरोदे विरोधात विविध कलमांनुसार अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस पथक त्याच्या शोधासाठी तैनात करण्यात आले होते.

गवनेर सरोदे मागील दोन दिवस संगमनेर, अहिल्यानगर, मुंबई आणि पुणे अशा विविध ठिकाणी फिरून पोलिसांना चकवा देत होता. अखेर, पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप हजारे, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, हेडकॉन्स्टेबल सुहास गोरे आणि अविनाश गोडगे यांच्या पथकाने त्याला पुण्यात अटक केली.

१७ मार्च रोजी शहापूर (जि. ठाणे) येथे एका संवादादरम्यान सरोदेने महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे सांगितले जाते. त्याची संबंधित व्हिडिओ क्लिप सोमवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आंबड गावात तीव्र संताप उसळला. शेकडो ग्रामस्थ, शेतकरी, युवक व महिलांनी निषेध रॅली काढून मुख्य चौकात सरोदेच्या प्रतिमेचे दहन केले आणि त्याच्या अटकेची मागणी केली.

आक्रोश वाढत असताना, आंबड गावातील आंदोलक अकोले पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन देत त्वरीत कारवाईची मागणी केली. त्यानंतर अकोलेत कोल्हार-घोटी राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. काही आंदोलकांनी सरोदे कार्यरत असलेल्या अमृतसागर दूध संघ कार्यालयात जाऊन त्याला नोकरीतून निलंबित करण्याची मागणी केली.

जनभावना लक्षात घेऊन पोलिसांनी सरोदेचा शोध घेऊन अखेर बुधवारी पुण्यात त्याला अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe