अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- कुपनलिकेच्या व्यवहारातील पैशावरून खुनी हल्ला करणार्या आरोपीचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी नामंजूर केला आहे. रामा भागा आघाव (रा. चिंचाळे ता. राहुरी) असे जामीन अर्ज नामंजूर केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चिंचाळे गावात कुपनलिकेच्या व्यवहाराच्या वादातून 3 मे 2019 रोजी लहानू कचरू आघाव व इतरांवर खुनी हल्ला झाला होता. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील आरोपी रामा आघाव हा गुन्हा झाल्यापासून पसार होता. त्यास राहुरी पोलिसांनी 24 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली.
त्याने नियमित जामीन अर्ज मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. आरोपी रामा आघाव याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झालेले नाही.
गुन्ह्याचा तपास प्रलंबित असल्याने जामीन देऊ नये, असे म्हणणे सरकारी वकील ए. बी. चौधरी आणि फिर्यादीचे वकील प्रवीण पालवे यांनी सादर केले. त्यांना वकील डी. वाय. जंगले यांनी सहकार्य केले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून जामीन अर्ज नामंजूर केला आहे.













