शीतपेयाच्या खरेदी पोटी व्यापाऱ्याला दिलेले ४ धनादेश न वटल्याने आरोपीस वेगवेगळ्या खटल्यामध्ये प्रत्येकी ६ महिन्यांची शिक्षा येथील न्यायाधीश गिरीश देशमुख यांच्या न्यायालयाने सुनावली आहे. रोहित बाळासाहेब हासे (रा. गुंजाळवाडी, संगमनेर), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोहित हासे याने या खटल्यातील फिर्यादी ऋषिकेश एजन्सीचे मालक अनंत दिगंबर कल्याणकर यांच्याकडून विविध शितपेये विक्रीसाठी खरेदी केले होते. या खरेदी पोटी त्याने कल्याणकर यांना प्रत्येकी ५० हजार, ६० हजार, ५२ हजार ६०५ व ६० हजारांचे, असे ४ धनादेश दिले होते.
मात्र कल्याणकर यांनी बँकेत भरलेले हे चेक न वटता परत आल्याने फिर्यादी अनंत कल्याणकर यांनी आरोपी व्यावसायिक रोहित हासे यांच्याकडे देय असलेल्या पैशाची मागणी केली होती. नोटीस मिळाल्यानंतर देखील हासे याने कल्याणकर यांना पैसे परत केले नाही.
त्यामुळे कल्याणकर यांनी अॅड. विजयानंद पगारे यांच्या मार्फत हासे याच्या विरोधात संगमनेर न्यायालयात स्वतंत्र ४ केसेस दाखल केल्या होत्या. न्यायाधीश देशमुख यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले.
तक्रारदाराचे वकील विजयानंद पगारे आणि आरोपीचे वकील यांच्या युक्तीवादा दरम्यान, विविध खटल्यांचा आधार घेण्यात आला. दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पुराव्याच्या आधारे न्यायालयाने तक्रारदाराची बाजू मान्य करत आरोपी रोहित बाळासाहेब हासे याला सर्व खटल्यात दोषी ठरवत प्रत्येकी ६ महिन्यांची शिक्षा आणि प्रत्येक खटल्यात चेकच्या दुप्पट रक्कम तक्रारदाराला देण्याचे आदेश दिले आहे.