अमरधाममध्ये नवजात मृत अर्भक टाकून पळणाऱ्या आरोपीला काही तासात अटक !

Ahmednagarlive24 office
Published:
arbhak

शुक्रवारी (दि.२) रात्री नालेगाव येथील अमरधाममध्ये नवजात मृत अर्भकाचा अंत्यविधी न करता, ते मृत अर्भक तसेच टाकून पळणाऱ्या आरोपीला नगरच्या कोतवाली पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली.

अमरधाम येथील एका खोलीत नवजात मृत अर्भक कोणीतरी आणून टाकले आहे, अशी माहिती शुक्रवारी रात्री ११ वाजता अमरधाम येथील वॉचमनने उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती व कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिली.

त्यांनी तातडीने पोलिस कर्मचाऱ्यांसह अमरधाम येथे भेट दिली आणि या घटनेचा तपास करण्याची सूचना केली. गुन्हे शोध पथकातील अंमलदार सुरज कदम आणि सुजय हिवाळे यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात मृत अर्भकाच्या नातेवाईकांचा शोध घेतला.

अर्भकाचे वडिल व नातेवाईकांकडे विचारपूस केली असता, त्यांनी पोलिसांना सांगितले की, नवजात अर्भक हे जन्म घेण्यापूर्वीच मयत झाले होते. त्याचा अंत्यविधी करण्यासाठी त्यास नालेगाव येथे घेऊन गेले असता, त्यांना तेथे एक अनोळखी व्यक्ती भेटला.

मी अमरधाम येथे त्या अर्भकाचा अंत्यविधी करतो, असे त्याने सांगितले. अर्भकाच्या आईस आयसीयुमध्ये अॅडमीट करायचे असल्याने त्यांनी अर्भक अंत्यविधी करण्यााठी त्या व्यक्तीकडे सुपूर्द केले व ते तेथून निघून गेले.

कोतवाली पोलिसांनी या घटनेची पूर्ण पडताळणी केली. अर्भकाचे आई- वडिल व नातेवाईकांवर गुन्हा दाखल न करता त्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेतला व अर्जुन मुथ्थू स्वामी या आरोपीला अटक केली.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, सहायक फौजदार गिरीश केदार, अंमलदार विशाल दळवी, सलीम शेख, सुरज कदम, सुजय हिवाळे, अतुल काजळे, दीपक रोहोकले, तानाजी पवार यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe